अक्षय कुमार लवकरच ‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्याबरोबर अनेक लोकप्रिय कलाकार दिसणार आहेत. त्यामध्ये रवीना टंडन, लारा दत्ता, परेश रावल, सुनील शेट्टी, राजपाल यादव, संजय दत्त असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत असणार आहेत.

अक्षय कुमार अनेकदा त्याच्या व्यावसायिक आयुष्याप्रमाणेच त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो. अक्षय कुमार हा त्याच्या फिटनेस आणि शिस्तबद्ध जीवनशैलीसाठी लोकप्रिय आहे. आता त्याच्या मुलांना शिस्त लावण्यात त्याचा किती वाटा आहे, त्याचे मुलांबरोबर कसे बॉण्डिंग आहे याबद्दल अभिनेत्याने एका मुलाखतीत वक्तव्य केले होते.

“शिस्त लावण्याची संपूर्ण जबाबदारी…”

अक्षय कुमार एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हणालेला, “मी खूप कडक शिस्तीचा नाही, शिस्त लावण्याची संपूर्ण जबाबदारी माझ्या पत्नीची आहे. ती खूप गंभीर स्वभावाची आहे; ती मला, नितारा व आरव अशा तिघांनाही शिस्तीत ठेवते. मी माझ्या मुलाचा मित्र आहे. तो २३ वर्षांचा आहे. तो लवकर मोठा झाला. तो सध्या शिक्षण घेत आहे आणि अभ्यास करण्यात व्यग्र आहे. त्याला कोणत्याही वाईट सवयी नाहीत. तो ट्विंकलसारखा आहे. कारण- ट्विंकलसुद्धा सतत अभ्यास करत असते.”

भविष्यात त्याचा मुलगा चित्रपटसृष्टीत येईल का? त्यावर अक्षय म्हणाला, “त्याला मनोरंजन सृष्टीत करिअर करायचे नाही. त्यानं मला स्पष्ट सांगितलं आहे की, मला या क्षेत्रात यायचं नाही. मी त्याला माझ्या प्रॉडक्शन कंपनीत काम करण्यासाठीसुद्धा सुचवले; पण त्याला ते करायचं नाही. त्याला फॅशन क्षेत्रात काम करायचं आहे. त्याला डिझायनर बनायचं आहे. सध्या तो फॅशन क्षेत्रातील शिक्षण पूर्ण करीत आहे. तो त्याच्या आयुष्यात आनंदी आहे; पण मीसुद्धा त्याच्या निर्णयानं आनंदी आहे.”

अक्षयच्या मुलाबद्दल बोलायचे तर तो वयाच्या १५ व्या वर्षी शिक्षणासाठी लंडनला गेला आहे. तो प्रसिद्धीझोतापासून कायमच दूर राहत असल्याचे दिसते. सध्या तो लंडनमध्ये फॅशन डिझाइनमध्ये कोर्स पूर्ण करत आहे.

आणखी एका मुलाखतीत अक्षय कुमार मुलगा आरवबद्दल म्हणालेला, “आरव आज ४,५०० रुपयांची नोकरी करत आहे. तो सध्या गावागावांत फिरून तिथली फॅशन, विविध प्रकारचे प्रिंट्स आणि डिझाईन्सचा अभ्यास करत आहे. मी त्याला जास्त सल्ले देत नाही. मी फक्त त्याला इतकेच सांगितले आहे की कोणाचे नुकसान करू नकोस.”

दरम्यान, अक्षय कुमारचा नवीन सिनेमा प्रेक्षकांची मने जिंकणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.