Akshay Kumar and Wamiqa Gabbi Age Gap: जेव्हा सिनेमे प्रदर्शित होतात, त्यावेळी अनेकदा लूकवरून, चित्रपटाच्या गोष्टीवरून, काही वेळा कलाकारांवरून वाद होतात. आता ‘भूत बंगला’ या सिनेमात अक्षय कुमार आणि वामिका गब्बी एकत्र झळकले आहेत. त्यांच्यातील वयाच्या अंतरावरून मोठी चर्चा होताना दिसत आहे. अक्षय कुमार ५८ वर्षांचा आहे. वामिका गब्बी ही २६ वर्षांची आहे.

विशेष म्हणजे नायक आणि नायिका यांच्यातील इतका वयाचा फरक असणारे हे पहिले कलाकार नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या वयाचे नायक आणि कमी वयाच्या नायिका प्रमुख भूमिकेत दिसतात.

अक्षय कुमार आणि अभिनेत्रींमधील वाढत्या ‘Age Gap’ ची होतेय चर्चा

९० च्या दशकाच्या सुरुवातीला काही मोजकेच कलाकार सुपरस्टार होते. अक्षय कुमार, सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, अजय देवगण, हृतिक रोशन या कलाकारांचा दबदबा होता. जेव्हा त्यांचे वय वाढले, तेव्हा त्यांच्याबरोबर झळकणाऱ्या नायिका या कमी वयाच्या असल्याचे दिसले.

अक्षय कुमारचे उदाहरण पाहिले असता २०१६ पासून त्याने ३९ चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये त्याच्या आणि नायिकांमधील वयातील अंतर दिसून येते.

२०१६ मध्ये त्यानी ‘एअरलिफ्ट’मध्ये निम्रत कौरबरोबर काम केलं, ज्यात दोघांमध्ये १४ वर्षांचं अंतर होतं. ‘हाउसफुल ३’मध्ये जॅकलिन फर्नांडिस त्याच्याबरोबर प्रमुख भूमिकेत होती, त्यांच्यात १८ वर्षांचं अंतर आहे, तर ‘रुस्तम’मध्ये प्रमुख भूमिकेत दिसलेली इलियाना डी’क्रूझ आणि अक्षय कुमारमध्ये १९ वर्षांचं अंतर आहे. २०१७ मध्येही हा ट्रेंड कायम राहिला. ‘जॉली एलएलबी २’मधील हुमा कुरेशी हिच्याबरोबर १९ वर्षांचं अंतर आहे. ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ मध्ये भूमी पेडणेकर त्याच्यापेक्षा २२ वर्षांनी लहान होती.

२०१८ मध्ये आलेल्या ‘पॅडमॅन’मधील राधिका आपटे आणि अक्षय कुमार यांच्यात १८ वर्षांचं अंतर होतं, तर ‘गोल्ड’मध्ये मौनी रॉय आणि त्याच्यात साधारण १८ वर्षांचं अंतर होतं. २०१९ मध्ये आलेल्या ‘केसरी’मधील परिणीती चोप्रा आणि त्याच्यामध्ये २१ वर्षांचं अंतर, ‘हाउसफुल ४’मध्ये क्रिती सेनॉन आणि त्याच्यात २३ वर्षांचं अंतर आणि ‘गुड न्यूज’मध्ये करिना कपूर आणि अक्षय कुमार तुलनेने कमी म्हणजे १३ वर्षांचं अंतर होतं.

२०२० मध्ये ‘लक्ष्मी’मध्ये कियारा अडवाणी त्याच्यापेक्षा २४ वर्षांनी लहान होती. २०२१ मध्ये ‘बेल बॉटम’मध्ये वाणी कपूर २१ वर्षांनी आणि ‘सूर्यवंशी’मध्ये कतरिना कैफ १६ वर्षांनी लहान होती.

२०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सम्राट पृथ्वीराज’मध्ये मानुषी छिल्लर ही अक्षय कुमारपेक्षा ३० वर्षांनी लहान होती, तर ‘कटपुतली’मध्ये रकुल प्रीत सिंह २३ वर्षांनी लहान होती. २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सरफिरा’ सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसलेली राधिका मदान त्याच्यापेक्षा २८ वर्षांनी लहान होती. वर्षानुवर्षे नायक व नायिकांच्या वयात तितकाच फरक असल्याचे दिसते.

दरम्यान, अक्षय कुमारच नाही तर शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान आणि अजय देवगण यांनी त्यांच्यापेक्षा अतिशय कमी वय असलेल्या अभिनेत्रींबरोबर काम केले आहे.