Akshay Kumar on Education: अक्षय कुमारने ‘सौंगध’ या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. १९९१ ला हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्याने अनेक ॲक्शन सिनेमात काम केले, काही विनोदी भूमिका साकारल्या, तसेच गंभीर भूमिकांमधूनही त्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.

‘स्पेशल ३६’, ‘हॉलिडे’, ‘सूर्यवंशी’, ‘मिशन मंगल’, ‘हाऊसफुल’, ‘गुड न्यूज’, ‘बेबी’, ‘गब्बर इज बॅक’, ‘ओएमजी २’, ‘जॉली एलएलबी ३’, ‘सिंघम अगेन’ असे त्याचे अनेक चित्रपट गाजले. अभिनेता विविध धाटणीच्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो.

आता अक्षय कुमार त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. जास्त शिक्षण घेतलेल्या लोकांमध्ये कधी कधी आपण लहान आहोत असे वाटते, थोडा कमीपणा वाटतो असे अभिनेता म्हणाला आहे. अक्षय कुमार नेमकं काय म्हणाला आहे हे जाणून घेऊ…

Award Banner

सध्या अक्षय कुमार ‘व्हील ऑफ द फॉर्च्यून’ या शोचे सूत्रसंचालन करत आहे. या शोमध्ये तो काही किस्सेदेखील सांगतो. शोमध्ये सोनाली नावाच्या स्पर्धकाबरोबर बोलताना अभिनेत्याने तिच्या शिक्षणाचे कौतुक केले.

“तुमच्यासारख्या लोकांसमोर कुठल्याही व्यक्तीला….”

अभिनेता तिला म्हणाला, “तुमच्यासारख्या लोकांसमोर कुठल्याही व्यक्तीला खासकरून माझ्यासारख्या कमी शिकलेल्यांना कमीपणा वाटतो, मलाही अनेकदा तसे वाटते. कधी कधी मला वाटते की मी शिक्षण घ्यायला हवे. अनेकदा असेही वाटते की शिक्षण घेतले असते तर बरे झाले असते. पण, आता शिक्षण घ्यायचे म्हटले तरी घेऊ शकत नाही, कारण मला अभ्यास करायला आवडत नाही.”

याच शोमध्ये अक्षय कुमार पत्नी ट्विंकल खन्नाबद्दल म्हणाला, “माझी पत्नी लेखिका आहे, ती पुस्तके लिहिते. एक नाही, दोन नाही, तीन नाही तर आतापर्यंत तिने चार पुस्तके लिहिली आहेत. तुम्हाला विश्वास बसणार नाही की मी आजपर्यंत तिचे एकही पुस्तक वाचले नाही. जेव्हाही मी पुस्तक वाचायला बसतो, तेव्हा माझ्या डोळ्यांतून पाणी येते.” ट्विंकल खन्नाने लंडनमधून तिची मास्टर्स डिग्री पूर्ण केली आहे.

पुढे तो म्हणाला, “आयुष्यात शिक्षण हे खूप महत्त्वाचे आहे. मी माझ्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देतो. माझ्या पत्नीने नुकतीच मास्टर डिग्री पूर्ण केली आहे. पुढे ती पीएचडी करण्याचा विचार करत आहे. हे सर्व सांगण्याचा उद्देश हा आहे की माझ्यासारख्या लोकांना तुम्ही फॉलो करू नका, तर सोनल सारख्या शिकलेल्या लोकांना फॉलो करा.”

काही रिपोर्ट्सनुसार, अक्षय कुमारने माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आहे, मात्र त्याने पदवीचे शिक्षण घेतले नाही. त्याने मुंबईत त्याचे शालेय शिक्षण पूर्ण केले. तसेच, गुरू नानक खालसा कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले, पण ते पूर्ण केले नाही. बँकॉकमध्ये त्याने मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेण्यासाठी पुढील शिक्षण घेतले नाही.

दरम्यान, अभिनेता सध्या त्याच्या ‘भूत बंगला’ या सिनेमामुळे चर्चेत आहे.