Avinash Wadhawan on Akshay Kumar discipline: ‘जुनून’सारख्या चित्रपटांसाठी अविनाश वाधवन हा अभिनेता ओळखला जातो. १९९० च्या दशकात अभिनेत्याने विविध सिनेमांत काम केले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अविनाशने इंडस्ट्रीत आल्यानंतर अक्षय कुमारबरोबर मैत्री झाली, असे सांगितले. दोघांनाही लोकप्रियता मिळण्याआधीपासून त्यांच्यात उत्तम मैत्री झाली होती.

अभिनेत्याने नुकतीच ‘हिंदी रश’ला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत तो अक्षय कुमारबद्दल म्हणाला, “मी अक्षयला तेव्हापासून ओळखतो, जेव्हा आम्हा दोघांनाही हीरो म्हणून भूमिका मिळत नव्हत्या, तशी आमची ओळख निर्माण झाली नव्हती. आम्ही दोघेही लोखंडवाला येथे राहायचो. दोघांकडेही मोटरसायकल असल्यामुळे आम्ही एकमेकांच्या गाडीवरून जायचो. त्यामुळे पेट्रोलचा खर्च वाचायचा. जेव्हा त्याचे फोटोशूट असायचे तेव्हा तो माझ्या घरी यायचा आणि माझे जॅकेट घेऊन जायचा. जेव्हा माझे फोटोशूट असायचे तेव्हा मी त्याच्या घरी जाऊन त्याचे जॅकेट घेऊन जायचो.”

“जो पहाटे ५ वाजता…”

याच मुलाखतीत अभिनेत्याने अक्षय कुमारच्या शिस्तबद्ध जीवनशैलीबद्दल सांगितले. तो सिनेसृष्टीत येण्याआधीपासूनच फिटनेस आणि शिस्तबद्धतेकडे लक्ष देत असे, असा खुलासा अभिनेत्याने केला. अविनाशने पुढे, “तो असा मुलगा होता, जो पहाटे ५ वाजता उठायचा. मी जिथे पेईंग गेस्ट म्हणून राहायचो, तो तिथे ६ वाजता मला उठवण्यासाठी यायचा, तेव्हा मी गाढ झोपेत असायचो. वर्सोवामध्ये नाना-नानी पार्क होते. तो तिथे व्यायामासाठी जायचा. तिथे तो ट्रेनिंग घ्यायचा. त्यानं मला अनेकदा त्याच्याबरोबर यावं असं सांगितलं; पण मी कधीच गेलो नाही. मला इतक्या लवकर उठणं शक्य नव्हतं”, असे म्हणत अक्षय कुमार अनेक वर्षांपासून असेच शिस्तबद्ध आयुष्य जगत असल्याचे सांगितले.

अविनाश असेही म्हणाला की, गेल्या अनेक वर्षांपासून अक्षयच्या दिनचर्येत काहीच बदल झालेला नाही. तो म्हणाला, “अक्षयबद्दल मला एक गोष्ट विशेष जाणवली आणि ती म्हणजे तो नेहमी वेळेवर यायचा. तो फिटनेसच्या बाबतीत खूपच काटेकोर होता. काम संपल्यानंतर तो घरी जायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अगदी वेळेवर पुन्हा सेटवर हजर असायचा.”

अक्षयचा आणखी एक किस्सा सांगत अभिनेता म्हणाला, “मला अजूनही आठवतं की, एकदा आम्ही दोघेही उटीमध्ये होतो. मी एका चित्रपटाचं शूटिंग करीत होतो, तर तो दुसऱ्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी तिथे आला होता. मात्र, आम्ही एकाच हॉटेलमध्ये थांबलो होतो. माझे शूटिंग सकाळी ७ वाजता सुरू व्हायचे, त्यामुळे मी उठून तयार व्हायचो, नाश्ता करायचो आणि सेटवर निघून जायचो. त्याचे शूटिंग मात्र सकाळी ९ वाजता सुरू व्हायचे; पण तो सकाळी ६ वाजताच धावताना दिसत असे. तो अशाच पद्धतीने आयुष्य जगतो.”

दरम्यान, बॉलीवूडमध्ये आल्यानंतर सुरुवातीच्या काळात इतकी चांगली मैत्री असूनही आता ते अजिबात संपर्कात नाहीत, असेही अभिनेत्याने सांगितले. पाच-सहा वर्षांपूर्वी त्यांचे एकदा बोलणे झाले होते. पण, ती मैत्री तशीच ठेवण्यासाठी किंवा तसाच संपर्क राहावा यासाठी दोन्ही बाजूंकडूनही प्रयत्न केले गेले नाहीत, असेही अभिनेत्याने सांगितले.