Akshaye Khanna Dhurandhar : ‘धुरंधर’ चित्रपटानं गेला महिनाभर सर्वांच्याच मनावर गारूड केलं आहे. त्यात अक्षय खन्नाच्या अभिनयाची तर सर्वत्रच प्रशंसा होत आहे, जो तो त्याचं कौतुक करीत आहे. मात्र, एका व्यक्तीनं अद्याप हा सिनेमा पाहिलेलाच नाहीय. आदित्य धर यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाचं सर्वत्र कौतुक होत असतानाया व्यक्तीला मात्र हा सिनेमा कसा आहे, ते माहीतच नाही.
ही व्यक्ती दुसरी-तिसरी कुणी नसून, अक्षय खन्नाचा भाऊ राहुल खन्ना आहे. ‘धुरंधर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करीत आहे. त्याशिवाय समीक्षक आणि प्रेक्षक अक्षय खन्नाच्या रहमान डकैत या भूमिकेच्या अभिनयावर भरभरून प्रेम करीत आहेत. ‘धुरंधर’ आणि त्यातील अभिनयाबद्दल सर्व जण अक्षय खन्नाचं गुणगान गात असताना राहुल खन्नानं मात्र, अजूनही हा चित्रपट पाहण्यासाठी योग्य क्षणाची वाट पाहत आहे, असं म्हटलं आहे.
राहुल खन्नानं ‘धुरंधर’ का पाहिला नाही?
मिड-डेला दिलेल्या मुलाखतीत, राहुल खन्नानं सांगितलं की, अक्षयच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत असतानाही, त्यानं अद्याप ‘धुरंधर’ सिनेमा पाहिला नाहीय. तो म्हणाला की, तो त्याच्या वैयक्तिक कारणामुळे चित्रपट पाहण्यासाठी थांबला आहे आणि त्याला हा चित्रपट अक्षयबरोबरच पाहायचा आहे.
राहुल म्हणाला, “मी अजून हा चित्रपट पाहिलेला नाही. मी अक्षयला माझ्याबरोबर सिनेमा दाखवण्यासाठी थांबवलं आहे. पण त्यानं काहीही केलं तरी तो ते चांगलंच करतो. या सिनेमातही त्यानं चांगलीच भूमिका केली आहे. मला खात्री आहे की, तो ‘धुरंधर’मध्ये मोठ्या पडद्यावर खूपच अप्रतिम दिसत असेल.”
अक्षय खन्ना-राहुल खन्ना यांचं नातं
अक्षय खन्नानं पूर्वी आपल्या भावाशी असलेल्या नात्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत, त्यानं सांगितलेलं की, त्यांच्या नात्याची प्रगती ही नैसर्गिकरीत्या झाली आहे आणि या नात्यावर त्यांच्या पालकांकडून कोणताही दबाव नव्हता.
अक्षय खन्ना म्हणालेला, “माझं आणि माझ्या भावाचं नातं आमच्या पालकांपासून स्वतंत्र होतं. त्या दृष्टीनं ते कधीही बदललं नाही. प्रत्येक व्यक्तीसाठी जवळचं कुटुंब म्हणजे त्याचे पालक आणि भाऊ-बहीण. हे कुटुंब जेव्हा लहान होतं, तेव्हा तुम्ही जे उरलेलं आहे, त्याला अजून जास्त जपता.”
‘धुरंधर’चं बॉक्स ऑफिसवर वर्चस्व
‘धुरंधर’ चित्रपटानं सुरुवातीच्या काही दिवसांत बॉक्स ऑफिरवर हळुवार कमाई केली असली तरी या सिनेमानं अजूनही बॉक्स ऑफिसवर आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. पाचव्या शनिवारी, सिनेमानं भारतात १२.६० कोटी रुपये कमावले, ज्यामुळे त्याचं एकूण नेट कलेक्शन ८०६.८० कोटी रुपये झाले.
‘धुरंधर’नं जागतिक स्तरावर ‘जवान’ व ‘पठाण’ या चित्रपटांना कमाईत मागे टाकलं आहे. त्यानंतर आता ‘धुरंधर’ सिनेमा ‘KGF : Chapter २’च्या १,२१५ कोटी रुपयांच्या कमाईला चॅलेंज करणार आहे. त्याशिवाय ‘दंगल’ व ‘बाहुबली २’सारख्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीतही हा सिनेमा सामील होईल.
