Akshaye Khanna Malabar Hill House Price: आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर २’ याचित्रपटांनी जगभरात ३,२०३ कोटी रुपयांची तुफान कमाई करत बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. या चित्रपटात गँगस्टर ‘रहमान डकैत’ची दमदार भूमिका साकारून पुनरागमन करणारा अभिनेता अक्षय खन्ना सध्या चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटाच्या घवघवीत यशांनंतर अक्षय खन्नाने मुंबईतील सर्वात महागड्या मलबार हिल भागात ३३.२६ कोटी रुपयांचे एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे.
अक्षय खन्नाच्या अपार्टमेंटबद्दल माहिती
‘स्क्वेअर यार्ड्स’ वेबसाइटवर उपलब्ध कागदपत्रांवरील माहितीनुसार, अक्षय खन्नाने सप्टेंबर २०२६ मध्ये मुंबईतील मलबार हिल भागात हे घर खरेदी केले आहे. मलबार हिल रोडवरील ‘३० लिटल गिब्स’ येथील या अपार्टमेंटचा कार्पेट एरिया २,३४१.३९ स्क्वेअर फूट आहे. यामध्ये १७५.४५ स्क्वेअर फुटांची बाल्कनी आहे. तर, एकूण क्षेत्रफळ २,५१६.८४ स्क्वेअर फूट आहे. याचबरोबर अक्षयला तीन पार्किंग स्पेस मिळाली आहे. या व्यवहारासाठी अक्षय कोटीने १.९९ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी आणि ३०,००० रुपये नोंदणी शुल्क भरले आहे.
मलबार हिल हा दक्षिण मुंबईतील अतिशय प्रतिष्ठित आणि श्रीमंत एरिया आहे. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला हा भाग नेपियन सी रोड, वाळकेश्वर रोड आणि पेडर रोड या प्रमुख रस्त्यांशी कनेक्टेड आहेत. तसेच मरीन ड्राईव्ह, नरिमन पॉईंट आणि कुलाबा इथून जवळ आहे. जुही चावला, सनी देओल तसेच ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांची घरे मलबार हिल भागात आहेत.
अक्षय खन्नाने वाढवलं मानधन
अक्षय खन्नाने धुरंधर चित्रपटातून कमबॅक केलं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक विक्रम मोडले. धुरंधर व धुरंधर २ ने जगभरात ३२०३ कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाच्या यशानंतर अक्षय खन्नाने त्याच्या मानधनात मोठी वाढ केली आहे. अक्षय खन्ना शेवटचा ‘इक्का’ या कोर्टरूम ड्रामा चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याने २८ वर्षांनंतर सनी देओलबरोबर काम केलं होतं. लवकरच तो ‘महाकाली’ या पौराणिक काल्पनिक चित्रपटातून तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. यात तो ‘शुक्राचार्य’ यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ८ जानेवारी २०२७ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
