Farah Khan Talks About Akshaye Khanna : अक्षय खन्ना काही दिवसांपासून अनेकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. आधी ‘छावा’ आणि मग ‘धुरंधर’ या चित्रपटांमधील त्याच्या कामाचं अनेकांनी कौतुक केलं. फक्त चाहतेच नव्हे, तर इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनीही त्याच्या कामाचं कौतुक केलं. अशातच आता लोकप्रिय दिग्दर्शिका फराह खाननंसुद्धा अक्षय खन्नाबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.
आदित्य धर लिखित व दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटातील अक्षय खन्नाचा दमदार अभिनय, त्याचे संवाद आणि डान्स स्टेप्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. त्यानंतर अभिनेत्याच्या क्रेझमध्येही वाढ झाली. तेव्हापासून अनेक जण अक्षय खन्नाबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत आहेत. अशातच फराह खानलाही याबद्दल विचारल्यानंतर तिनं अक्षय खन्नाबद्दलच्या काही गोष्टी सांगितल्या आहेत.
फराहनं घेतलेला अक्षयबरोबर काम न करण्याचा निर्णय
अक्षय खन्नानं फरहा खानच्या ‘तिस मार खान’ या लोकप्रिय चित्रपटात काम केलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जरी फ्लॉप ठरला असला तरी नंतर मात्र त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळू लागला. सोशल मीडियावरही याबद्दल अनेक मीम्स व्हायरल होत असतात. फराह खाननं मात्र या चित्रपटातील अक्षयच्या कामाबद्दल बोलताना एक वेळ अशी होती जेव्हा तिनं ठरवून अक्षयबरोबर काम न करण्याचा निर्णय घेतला होता, असं म्हटलं आहे. फराह याबद्दल रणवीर अल्लाहबादियाशी संवाद साधताना म्हणाली, “९० च्या काळात मी अक्षय खन्नाबरोबर काही चित्रपट केले; पण त्यानंतर मला खूप त्रास झाला. कारण- तो पूर्वी खूप वेगळा माणूस होता. तो अबोल तर आहेच; पण सेटवर नीट वागायचा नाही. त्यामुळे जेव्हा मला समजायचं की एखाद्या चित्रपटामध्ये अक्षय खन्नासुद्धा आहे तेव्हा मी सांगायचे की, माझ्याकडे तारखा नाहीयेत.”
फराहनं अक्षय खन्नाचे तेव्हा केस गळत असल्याने तो खूप चिडचिड करायचा, असं म्हटलं आहे. दिग्दर्शिका म्हणाली, “मला असं वाटतं की, त्यावेळी तो स्वतःच म्हणालेला की, त्याचे केस गळत आहेत. तो सतत चिडचिड करायचा. गोष्टी फेकून द्यायचा आणि म्हणायचा की, हे काय संवाद आहेत.” परंतु, अक्षय खन्नाबद्दलचा फराह खानचा दृष्टिकोन बदलला जेव्हा तिनं ‘दिल चाहता है’ या चित्रपटासाठी अक्षय खन्नाबरोबर काम केलं. या चित्रपटातून तिचा भाऊ फरहान अख्तर दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार होता म्हणून तिला या चित्रपटाला नाही म्हणता आलं नाही. या चित्रपटादरम्यान अक्षय खन्नाबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत फराह खान म्हणाली, “तोपर्यंत तो पूर्ण बदलला होता. त्यानं त्याच्या केसांवर उपचार केले होते. तोपर्यंत तो खूप शांत झाला होता. जेव्हा कुठल्या सीनमध्ये पाणी किंवा पाऊस असायचा तेव्हा तो डोक्यावर टोपी घालायचा. ताल या गाण्यातसुद्धा त्यानं टोपी घातली होती. त्याच्या प्रत्येक गाण्यात त्यानं टोपी घातली आहे. तो खूप उत्तम नर्तक आहे. ‘कोई कहे कहता रहे’मध्ये तर त्यानं आमिर खान आणि सैफ अली खानपेक्षाही उत्तम डान्स केला आहे.”
‘धुरंधर’ पाहिल्यानंतर फराह खानची प्रतिक्रिया काय होती याबद्दल तिनं पुढे सांगितलं आहे. ती म्हणाली, “मी त्याला फोन केला आणि त्याच्या अलिबागच्या घरी गेले. मला त्याच्याबद्दलची ही गोष्ट आवडते की, तो देखावा करत नाही. त्याला खरोखरच अभिनय करायला आवडतो.”
