Akshaye Khanna Personal Life : ‘धुरंधर’मधील रहमान डकैतची भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. सगळीकडे फक्त अक्षयचीच चर्चा आणि त्याचेच डान्स व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. अक्षयच्या दमदार अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अक्षय खन्ना सध्या प्रचंड चर्चेत असून त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

५० वर्षांचा अक्षय खन्ना अविवाहित आहे. लग्न करून जबाबदाऱ्या नको, असं अक्षय खन्ना अविवाहित राहण्याबद्दल म्हणाला होता. पण असं असलं तरी अक्षयच्या गर्लफ्रेंड मात्र नक्कीच होत्या. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री करिश्मा कपूर होय. अक्षय व करिश्मा लग्न करणार होते, रणधीर कपूर यांनाही अक्षय खन्ना जावई म्हणून पसंत होता, पण तरीही हे दोघे वेगळे झाले.

अक्षय खन्ना व करिश्मा कपूरचं लग्न का होऊ शकलं नाही?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, १९९० च्या दशकात एकत्र फोटोशूट केल्यानंतर करिश्मा आणि अक्षय खन्ना यांच्यातील जवळीक वाढली. दोघे प्रेमात पडले आणि डेट करू लागले. त्यावेळी करिश्मा अजय देवगणपासून वेगळी झाली होती. त्या प्रेमभंगातून सावरायला अक्षय खन्नाने तिला मदत केली, असं म्हटलं जातं.

करिश्मा व अक्षयच्या नात्याबद्दल तिचे वडील रणधीर कपूर खूप खूश होते. त्यांनी अक्षयचे वडील विनोद खन्ना यांना दोघांच्या लग्नाचा प्रस्तावही पाठवला होता. दोघांच्या लग्नाच्या चर्चा बरीच पुढे गेल्या होत्या, परंतु करिश्माची आई बबिता कपूर यांनी हस्तक्षेप करून या दोघांचं लग्न होऊ दिलं नाही. त्यावेळी करिश्मा तिच्या करिअरच्या शिखरावर होती, त्यामुळे तिने कामावर लक्ष केंद्रित करावं, असं बबिता यांना वाटत होती. त्यावेळी अक्षय फार यशस्वी नव्हता, त्यामुळे करिश्माही या निर्णयाबद्दल साशंक होती. या कारणांमुळे करिश्मा व अक्षय वेगळे झाले, असं म्हटलं जातं.

करिश्मा कपूरने संजय कपूरशी केलेलं लग्न

करिश्मा कपूर नंतर अभिषेक बच्चनच्या प्रेमात पडली. अभिषेक व करिश्मा ५ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्यांचा साखरपुडाही झाला होता. पण लग्न होऊ शकलं नाही. अभिषेक व करिश्मा वेगळे झाले. नंतर काही महिन्यांनी करिश्मा कपूरने उद्योगपती संजय कपूरशी लग्न केलं. तिला संजयपासून समायरा व कियान ही दोन अपत्ये झाली. पण नंतर हिंसाचाराचे आरोप करत करिश्माने २०१६ मध्ये संजयपासून घटस्फोट घेतला. संजय कपूरचं जून २०२५ मध्ये निधन झालं. आता संजय कपूरची तिसरी पत्नी प्रिया सचदेव व करिश्मा कपूरची मुलं यांच्यात संपत्तीतील वाट्यावरून कायदेशीर लढाई सुरू आहे.