अक्षय खन्ना अलीकडच्या काळात त्याच्या दमदार कलाकृतींमुळे प्रचंड चर्चेत आला. अभिनेता गेली अनेक वर्षे इंडस्ट्रीत काम करत आहे पण, गेल्या दोन वर्षांपासून त्याच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली असून सोशल मीडियामुळे तरूणांमध्ये त्याची जबरदस्त क्रेझ आहे. २०२५मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘छावा’मधील औरंगजेबाच्या भूमिकेतून त्याने सगळ्यांना अवाक केलं. त्यानंतर ‘धुरंधर’सारख्या सुपरहिट चित्रपटात खलनायक साकारत अनेकांकडून कौतुकाची थाप मिळवली. यातील भूमिकेमुळे तर कित्येक दिवस सोशल मीडियासह प्रेक्षकांच्या मनावर त्याने राज्य केलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंह अभिनीत ‘धुरंधर’ चित्रपटात त्याने रहमान डकैत ही खलनायकाची भूमिका साकारली होती. यातील त्याच्या अभिनयाने, स्टाईलने आणि हटके अंदाजाने अनेकांना भुरळ घातली. त्यामुळे सर्वत्र त्याची इतकी चर्चा सुरू झाली की कलाकार मंडळींनाही त्यांचं कौतुक करण्याचा मोह आवरला नाही पण, आता याच लोकप्रियतेबद्दल अक्षय खन्नाने प्रतिक्रिया दिली आहे. याबद्दल त्याच्या आगामी ‘इक्का’ या चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ पी. मल्होत्रा यांनी सांगितलं आहे.

इक्कामधून एकत्र झळकणार सनी देओल – अक्षय खन्ना

‘छावा’ आणि ‘धुरंधर’सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर अक्षय खन्ना आता ‘इक्का’ या कोर्टरूम ड्रामामधून झळकणार आहे. त्यामुळे आता थिएटरमध्ये धुमाकुळ घातल्यानंतर या चित्रपटाच्या माध्यमातून अक्षय खन्ना ओटीटी गाजवण्यासाठीही सज्ज आहे. ‘इक्का’ या चित्रपटात बॉलीवूड अभिनेता सनी देओल मुख्य भूमिकेत आहे तर अक्षय खन्ना यामधून पुन्हा एकदा खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. बॉलीवूडमधील या दोन दमदार अभिनेत्याने एकाच कलाकृतीतून पाहणं प्रेक्षकांसाठी परवणी ठरेल. स्क्रीनला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक सिद्धार्थ पी. मल्होत्रा यांनी कोर्टरूम ड्रामाबद्दलचं त्यांचं प्रेम, सनी देओलच्या दमदार प्रतिमेला जपत त्याला नव्या कायदेशीर भूमिकेत दाखवण्याचं आव्हान, ‘धुरंधर’नंतर अक्षय खन्नाबरोबर पुन्हा काम करण्याचा अनुभव आणि आताचे प्रेक्षक आणि त्यांचा चित्रपटांकडे पाहण्याचा बदलेला दृष्टीकोण याबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला आहे.

दिग्दर्शक म्हणाले, “या प्रकारच्या कथांकडे मी इतका का ओढलो जातो, हे मलाही माहीत नाही. माझ्या पहिल्या ‘वी आर फॅमिली’ चित्रपटापासून हा विषय माझ्या मनात आहे. खरं तर हा चित्रपट मला खूप आधीच बनवायचा होता. धर्मा प्रॉडक्शन्समध्ये असल्यापासून मी ही कथा पडद्यावर आणण्याचा प्रयत्न करत होतो. मी करण जोहरला सांगितलं होतं, मला हा चित्रपट करायचा आहे. त्यानेही होकार दिला, पण ते घडलं नाही. त्यानंतर मी आदित्य चोप्राकडे गेलो. आदित्यने माझ्याबरोबर पटकथेवर काम केलं आणि इक्कामध्ये त्यांना त्याचं श्रेयही देण्यात आलं आहे. या चित्रपटाचा प्रवास खूप मोठा होता. अखेर सनी देओल, अक्षय खन्ना आणि नेटफ्लिक्सबरोबर हा चित्रपट ज्या पद्धतीने तयार झाला आहे, त्यापेक्षा चांगलं काही होऊच शकत नव्हतं.”

दिग्दर्शक पुढे याबद्दल म्हणाले, “हिचकीनंतर माझ्यासमोर ही कथा आली आणि मला वाटलं, ही गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचलीच पाहिजे. त्यानंतर मी महाराज चित्रपट केला. त्यानंतर नेटफ्लिक्ससाठी सनी सरांबरोबर दुसऱ्या एका चित्रपटावर काम करत होतो. मात्र काही कारणांमुळे तो चित्रपट होऊ शकला नाही. त्यावेळी त्यांनी मला विचारलं, सनी सरांबरोबर दुसरा चित्रपट करता येईल अशी आणखी एखादी कथा आहे का? मी त्यांना इक्काची कथा सांगितली. सनी सरांना ही कथा आधीपासूनच आवडली होती. साधारण दीड वर्षांपूर्वी बटवाराच्या सेटवर मी त्यांना ही कथा ऐकवली होती. त्यावेळी त्यांनी विचारलं, शौर्यमनची भूमिका कोण करणार? मी म्हणालो, सर, मला ही भूमिका अक्षय खन्नाने करावी असं वाटतं. त्यावर त्यांनी विचारलं, तो ही भूमिका स्वीकारेल का?”

अक्षय खन्नाने दोन दिवसांत दिला होकार

याबद्दल दिग्दर्शक पुढे म्हणाले, “मी अक्षय खन्नाला फोन केला. पटकथा दिल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत त्याचा फोन आला आणि त्याने हा चित्रपट करण्यास होकार दिला. ही गोष्ट गेल्या वर्षी सप्टेंबरची आहे. ऑक्टोबरमध्ये करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. त्यानंतर लूक टेस्ट झाली, नोव्हेंबरमध्ये चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं आणि डिसेंबरमध्ये ते पूर्णही झालं. हा चित्रपट मला ज्या पद्धतीने बनवायचा होता, त्यासाठी संधी मिळायला तब्बल नऊ वर्षे लागली. त्यामुळे मी या कथेबरोबर नऊ वर्षे जगलो. पण एकदा चित्रीकरण सुरू झाल्यावर आम्ही केवळ ३० शिफ्टमध्ये संपूर्ण चित्रपट पूर्ण केला.”

अक्षय खन्ना यशामुळे हुरळून जात नाही – सिद्धार्थ पी. मल्होत्रा

तुमच्या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असतानाच ‘धुरंधर’ प्रदर्शित झाला आणि अक्षय खन्ना पुन्हा एकदा रातोरात चर्चेत आला. ते पुढे म्हणाले, “आम्ही चित्रपटाची तयारी करत असतानाच धुरंधर’चं चित्रीकरण सुरू होतं. आम्ही शूटिंग सुरू केलं तेव्हा तो प्रदर्शित होण्याच्या मार्गावर होता आणि आमचं चित्रीकरण सुरू असतानाच तो रिलीज झाला. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जवळपास एकाच वेळी घडल्या. अक्षय खन्ना असा अभिनेता आहे की यशामुळे तो हुरळून जात नाही आणि अपयशामुळे खचूनही जात नाही. तो फार मुलाखती देत नाही किंवा जास्त बोलत नाही, म्हणून लोकांचा तसा समज होतो. पण प्रत्यक्षात तो अत्यंत साधा आणि जमिनीवर राहणारा माणूस आहे. आता तो माझा मित्रही आहे आणि त्याला नेमकं काय हवं आहे, याची त्याला पूर्ण जाणीव असते.”

अक्षय खन्नाची धुरंधरबद्दल प्रतिक्रिया

अक्षय खन्नाबद्दल सिद्धार्थ पुढे म्हणाले, “प्रत्येक दिग्दर्शकाला हवा असतो असा कलाकार आहे तो. त्याच्या आयुष्यात कोणताही अनावश्यक गुंता नाही. धुरंधरमुळे मिळालेलं हे प्रचंड प्रेम कायम राहणार नाहीये, याचीही त्याला जाणीव होती. तो मला म्हणालेला एक अभिनेता म्हणून मी माझं काम केलं आहे. चाहत्यांचं हे प्रेम आहे, पण हे आता थांबायला हवं. उलट त्याने मला सांगितलं, दडपण घेऊ नकोस. तू फक्त तुझा चित्रपट चांगला बनव त्यामुळे मीही कोणतंही दडपण घेतलं नाही”.