Farah Khan Talks About Akshaye Khanna : आदित्य धर लिखित व दिग्दर्शित ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ चित्रपटानं थिएटरमध्ये अक्षरशा धुमाकूळ घातला. प्रेक्षकांनी चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे या चित्रपटानं बॉक्स ऑफिसचे अनेक रेकॉर्ड मोडले. त्यातील अभिनेता अक्षय खन्नाच्या कामाचं तर अनेकांनी कौतुक केलं. अशातच फराह खाननंसुद्धा अक्षय खन्नाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

लोकप्रिय दिग्दर्शिका फराह खान तिच्या व्लॉगमुळे सतत चर्चेत असते. फराह आणि तिचा स्वयंपाकी दिलीप कुमार अनेक सेलिब्रिटींच्या घरी जाऊन त्यांच्याबरोबर गप्पा मारत वेगवेगळे पदार्थ बनविताना दिसतात. फराह खानचं स्वतःचं यूट्यूब चॅनेल आहे. त्यावर आजवर तिनं अनेक सेलिब्रिटींबरोबरचे व्हिडीओ शेअर केले आहेत. अशातच फराह खाननं नुकतीच ‘बिग बॉस १९’फेम मराठमोळा प्रणित मोरेच्या घरी भेट दिली. प्रणित व त्याच्या कुटुंबीयांबरोबर फराहनं अनेक गप्पा मारल्या. यावेळी प्रणितच्या आईनं कोकणी पद्धतीचं जेवण बनवल्याचं पाहायला मिळालं.

अक्षय खन्नाच्या ‘या’ चित्रपटाचं फराह खानने केलं कौतुक

प्रणितच्या घरी गेल्यानंतर फराह, दिलीप व प्रणित यांनी एकमेकांशी संवाद साधला. त्यावेळी प्रणित दिलीपला स्टॅण्ड अप कॉमेडीच्या काही टिप्स देत असतो. त्यावेळी दिलीप “तिस मार खान माझा आवडता चित्रपट आहे,” असे म्हणतो. त्याच वेळी फराह ‘धुरंधरनंतर ‘तिस मार खान’चंच राज्य सुरू आहे”, असं म्हणते. त्यावर प्रणित “खरा ऑस्कर तर त्याच चित्रपटात आहे तुमच्या”, असं म्हणतो. त्यावर फराह मोठ्यानं ऑस्कर, असं म्हणते.

फराहच्या त्या चित्रपटात अक्षय खन्नानं अभिनेता आतिश कपूरचं पात्र साकारलेलं, ज्याला काहीही करून ऑस्कर मिळवायचा असतो. फराह खानने दिग्दर्शन केलेला ‘तिस मार खान’ हा चित्रपट २०१० मध्ये प्रदर्शित झालेला. यामध्ये अक्षय खन्ना व कतरिना कैफ मुख्य भूमिकांमध्ये होते; परंतु या चित्रपटाला फार चांगला प्रतिसाद मिळाला नाही. फराहनं या व्हिडीओमध्ये मात्र ‘तिस मार खान’ आताच्या जेन झी पिढीला फार आवडत असल्याचं म्हटलं.

दरम्यान, फराह खाननं प्रणित मोरेचं ‘बिग बॉस’मधील त्याच्या गेमसाठी कौतुक केलं. फराहनं यावेळी प्रणितचे आई-बाबा, मावशी, दादा व वहिनी यांच्याशी संवाद साधला.