Dhurandhar Fame Actor Talks About Akshaye Khanna : आदित्य धर लिखित व दिग्दर्शित २०२५ च्या शेवटी प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला. त्यामध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहे; तर अक्षय खन्नाही महत्त्वपूर्ण भूमिकेतून पाहायला मिळतोय. चित्रपटांतील दोघांच्या भूमिकेने अनेकांचं लक्ष वेधलं. अशातच आता या चित्रपटातील अभिनेत्यानं अक्षय व रणवीरबद्दल सांगितलं आहे.

‘धुरंधर’मध्ये रणवीर सिंह व अक्षय खन्ना यांच्यासह बॉलीवूडमधील अनेक लोकप्रिय कलाकार झळकताना दिसत आहेत. त्यामध्ये अक्षय खन्नाच्या भावाची उजेर बलोच ही भूमिका साकारणारा अभिनेता दानिश पंडोरने अक्षय खन्ना व रणवीर सिंह चित्रपटाच्या सेटवर कसे असायचे याबद्दलची माहिती दिली आहे. यावेळी त्यानं अक्षय खन्ना व रणवीर सिंह यांचं कौतुक केलं आहे.

‘हिंदुस्तान टाइम्स’शी संवाद साधताना दानिश म्हणाला, “इंडस्ट्रीत स्थैर्य नाहीये. असे अनेक दिवस होते जेव्हा माझ्याकडे दोन-तीन वर्षं काहीही काम नव्हतं. तुम्ही ऑडिशन देत असता, नकार पचवत असता आणि काही वेळानंतर तुम्ही स्वत:ला प्रश्न विचारता.” ‘धुरंधर’बद्दल दानिश म्हणाला, “एका हिट चित्रपटामुळे तुम्हाला भविष्यातसुद्धा चांगली कामं मिळतील याची शाश्वती नसते. हो, त्यामुळे तुम्ही दिसता. तुमचं कौतुक होतं; पण तरीसुद्धा तुम्हाला बाहेर जाऊन स्वत:ला सिद्ध करावं लागतं.”

Award Banner

रणवीर कपूर नि:स्वार्थी आहे : दानिश पंडोर

रणवीर सिंहबद्दल दानिश म्हणाला, “रणवीर खूप चांगला अभिनेता आहे. तो इतरांना प्रोत्साहन देतो. त्याला त्याची किंमत माहीत आहे आणि तो नि:स्वार्थी अभिनेता आहे. त्याचा फक्त एकच उद्देश असतो की, सीन कसा चांगला होईल आणि त्यासाठी तो काय करू शकतो. तो सेटवर पूर्ण तयारीनिशी येतो आणि इतरांनाही प्रेरणा देतो.”

अक्षय खन्नाबद्दल काय म्हणाला ऑनस्क्रीन भाऊ?

अक्षय खन्नाबद्दल दानिश म्हणाला, “तो खूप कमी बोलतो. शांत बसलेला असतो. तो निरीक्षण करतो आणि जसं शूटिंग सुरू होतं तसा तो भूमिकेत शिरतो. तो शांततेत तयारी करतो. ही पद्धत खूप भारी आहे. त्यानं मला जास्त ऐकणं आणि निरीक्षण करणं याचा अभिनयात किती महत्त्वाचा वाटा आहे हे शिकवलं, जो अनुभव मला कुठलीही अभिनय शाळा शिकवू शकत नाही.”