Ali Zafar on Katrina Kaif Post Pregnancy Weight Gain Trolled: कतरिना कैफने पती विकी कौशलबरोबर अंबानींच्या घरी गणपतीच्या दर्शनाला गेली होती. आई झाल्यानंतर पहिल्यांदाच विकी व कतरिना सार्वजनिकरित्या एकत्र दिसले. दोघांचेही बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओत आई झाल्यानंतर कतरिनाचं वजन वाढलेलं दिसतंय. त्यावरून तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातंय. कतरिना आधी कशी दिसायची आणि आता कशी दिसतेय, असं ट्रोलर्स म्हणत आहेत. पाकिस्तानी अभिनेता अली जफरने कतरिनाला ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं आहे.
कतरिना कैफ व अली जफर यांनी ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. तिच्या वाढलेल्या वजनामुळे ट्रोल करणाऱ्यांचा अली जफरने समाचार घेतला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत अली जफर म्हणाला, “पुरुषांना कोणत्या प्रकारचे मानसिक आजार आहेत? मी सोशल मीडियावर कतरिना कैफबद्दलची एक पोस्ट आणि काही कमेंट्स पाहिल्या. त्यात ती वेगळी दिसतेय असं म्हटलंय.”
पाहा अली जफरचा व्हिडीओ
पुढे अली जफर म्हणाला, “पुरुष म्हणून आपल्याला असं वाटतं की स्त्रीचं शरीर नेहमीच आपल्याला वाटतं त्या पद्धतीने आकर्षक असलं पाहिजे आणि जर ते तसं दिसत नसेल, तर ती महिला चांगली नाही, चुकीची आहे. कोणत्याही व्यक्तीकडे या दृष्टिकोनातून पाहणं अत्यंत चुकीचं आहे. प्रत्येकाचा आपापल्या आयुष्यात वैयक्तिक संघर्ष सुरू असतो, कोणती व्यक्ती आयुष्यात कोणत्या परिस्थितीतून जातेय ते आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे आपण लोकांशी प्रेमाने आणि सहानुभूतीने वागलं पाहिजे. अगदी पुरुषांकडूनही नेहमी सिक्स-पॅक आणि फिट बॉडीची अपेक्षा ठेवणं योग्य नाही. नेहमी इतरांवर टीका करणं योग्य नाही. कोणीही परफेक्ट नसतं, हे समजून घेऊन स्वतःत सुधारणा करणं गरजेचं आहे.”
दरम्यान, अली जफर व कतरिना कैफ यांनी २०११ साली आलेल्या ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्याचबरोबर अली जफरने तेरे बिन लादेन, चश्मे बद्दूर, टोटल सियापा, किल दिल, डियर जिंदगीसारखे बॉलीवूड चित्रपट केले आहेत.
