Alia Bhatt’s Alpha To Release Directly On Ott : आलिया भट्ट बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अभिनेत्रीचा चाहतावर्गही खूपच मोठा आहे. आलिया शेवटची रणबीर कपूरसह ‘ब्रह्मास्त्र’ मधून झळकलेली. त्यानंतर ती व शर्वरी वाघ यशराज प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या ‘अल्फा’मधून झळकणार होत्या. मोठ्या पडद्यावर हा चित्रपट प्रदर्शित होणार होता; पण आता कदाचित हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार नाही.

यशराज प्रॉडक्शनची निर्मिती असलेला हा चित्रपट या निर्मिती संस्थेचा पहिला स्त्री कलाकार मुख्य भूमिकेत असलेला स्पाय चित्रपट आहे. त्यामध्ये शर्वरी व आलिया यांच्यासह बॉबी देओलसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. ‘डेक्कन क्रॉनिकल’च्या वृत्तानुसार आदित्य चोप्रा यांना राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी ३’ चित्रपटामुळे आलियाच्या ‘अल्फा’ला चालना मिळेल, अशी अपेक्षा होती.

नेमकं काय घडलं?

उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार ‘मर्दानी ३’ अपेक्षेप्रमाणे यशस्वी न ठरल्यामुळे आणि ‘वॉर २’मुळे स्पाय युनिव्हर्सलाही फटका बसल्याने, यशराज फिल्म्समध्ये ‘अल्फा’ हा प्रोजेक्ट सध्या स्थगित ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ‘अल्फा’ सरळ ओटीटीवरच प्रदर्शित होणार असल्याने आलिया भट्ट याविरोधात असून, ती हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित व्हवा यासाठी प्रयत्नशील आहे, अशी चर्चा सुरू आहे. अद्याप याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

गेल्या वर्षी रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये आलियाने या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिलेली. न्यूज १८च्या वृत्तानुसार आलिया भट्ट म्हणालेली, “अल्फा हा स्त्री कलाकार मुख्य भूमिकेत असलेला यशराज प्रॉडक्शनचा पहिला स्पाय थ्रिलर चित्रपट आहे. त्यामुळे यापूर्वी पुरुष कलाकार मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटांना जसा प्रतिसाद मिळाला तसाच यालासुद्धा मिळेल का याबाबत शंका आहे.”

आलिया व शर्वरी यांचा ‘अल्फा’ हा चित्रपट आधी २०२५ मध्ये ख्रिसमसमध्ये प्रदर्शित होणार होता. परंतु, नंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आला. १७ एप्रिल २०२६ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. त्यामुळे आता हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार की ओटीटीवर याचं उत्तर येत्या काळातच मिळेल.