Alia Bhatt Birthday : वर्ष होतं २०१२…करण जोहरच्या लाडक्या ‘स्टुडंट’ने बॉलीवूडमध्ये ‘हिरोईन’ म्हणून पदार्पण केलं. घरातच लाभलेला अभिनयाचा वारसा, सिनेविश्वात नाव कमावलेली बहीण, दिग्दर्शक वडील अन् गॉडफादर करण जोहर. या चौकटीमुळे तिच्या पहिल्याच सिनेमावर ‘नेपोकिड’, ‘घराणेशाही’चा ठपका बसला अन् इथूनच आलिया भट्टचा ‘शानदार’ अभिनेत्री होण्याचा प्रवास सुरू झाला. गेल्या १२ वर्षांत प्रचंड मेहनत करून तिने प्रेक्षकांना नेपोटिझमचा ‘कलंक’ पुसायला ‘राझी’केलं आणि बॉलीवूडची ‘संघर्ष’ करणारी खरी ‘गंगूबाई’ मीच आहे हे ठासून सांगितलं.

‘हायवे’ असो किंवा ‘उडता पंजाब’ आलियाचा हिरोईन ते अभिनेत्री होण्याचा प्रवास थक्क करणारा होता. अभिनयाची आवड, जिद्द आणि कामाप्रती असलेलं प्रेम या सगळ्याचा उत्तम मेळ साधल्यामुळे २०१२ मध्ये स्क्रीनवर दिसणाऱ्या अवखळ ‘शनाया’चं रुपांतर समंजस अशा ‘राणी चॅटर्जी’मध्ये कधी होऊन गेलं हे समजलंच नाही.

Kavita Kaushik stuck in Badrinath
“बाथरूम वापरण्यासाठी २०० रुपये…”, पतीसह फिरायला गेलेली ‘चंद्रमुखी चौटाला’ भूस्खलनामुळे बद्रीनाथमध्ये अडकली
Ronit Bose and wife Neelam buys apartment in mumbai
सेलिब्रिटी जोडप्याने मुंबईत घेतलं घर, आलिशान अपार्टमेंटसाठी मोजले १९ कोटी रुपये
genelia deshmukh barefoot walk on new york street
Video : परदेशात अनवाणी फिरतेय देशमुखांची सून, जिनिलीयाच्या न्यूयॉर्कमधील व्हिडीओने वेधलं लक्ष
marathi actress dances on pushpa 2 sooseki song
जुलैमध्ये वाढदिवस, लवकरच झळकणार चित्रपटात; ‘पुष्पा २’च्या गाण्यावर थिरकणाऱ्या ‘या’ मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का?
Tamayo Perry Killed In Shark Attack
समुद्रात सर्फिंग करताना शार्कने केलेल्या हल्ल्यात अभिनेता तामायो पेरी याचे निधन
marathi actors Shubhankar Tawde dance On Angaaron Song Of Pushpa 2 The Rule Movie
Video: मराठी अभिनेत्याचा स्विमिंग पूलमध्ये ‘पुष्पा २’मधील ‘अंगारो’ गाण्यावर मजेशीर डान्स, हटके स्टेप्सनं वेधलं लक्ष
pani puri seller does mimicry and calls out people in Shahrukh khan Sunny Deol voice
चक्क शाहरुख- सनीचा आवाज काढत विकतो पाणी पुरी, टॅलेंटेड तरुणाचा VIDEO होतोय व्हायरल
Not Alia Bhatt and Priyanka Chopra Deepika Padukone is the highest paid actress in hindi cinema in 2024
आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा नव्हे तर ‘ही’ ठरली २०२४ मधली सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री, पाहा यादी

हेही वाचा : ऋतुजा बागवे : रंगभूमीवर रमणाऱ्या ‘अनन्या’ला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार

पहिलाच चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आलियाने सगळ्या टीमबरोबर ‘कॉफी विथ करण’मध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? असा प्रश्न करणने विचारला असता आलियाने अतिउत्साहाने चुकीचं उत्तर दिलं होतं आणि इथूनच सुरू झालं ट्रोलिंग… पुरस्कार सोहळे असो किंवा पत्रकार परिषद आलियाला सर्वत्र सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जाऊ लागले. या सगळ्या प्रसंगांचा सामना देखील अभिनेत्रीने मोठ्या धीराने केला. ट्रोलर्सला हसत-हसत उत्तर देऊन तिने सकारात्मकतेने प्रत्येकाच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली.

आलिया भट्ट ट्रोलिंगविषयी एक्स्प्रेस अड्डाच्या मुलाखतीत सांगते, ” मला त्यावेळी सर्वत्र ट्रोल करण्यात आलं, सोशल मीडियावर सगळीकडे माझे मीम्स बनवण्यात आले होते. पण, खरं सांगू का मला त्याचं काहीच वाटलं नाही. सध्याच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी केवळ सामान्य ज्ञान उपयोगी नसून, तुम्हाला भावनिकरित्या खंबीर राहणं महत्त्वाचं आहे. कदाचित माझं हे मत अनेकांना पटणार नाही पण, ट्रोलिंग सुरू असताना मी त्या सगळ्या गोष्टी आनंदाने स्वीकारल्या. मी हे जाहीरपणे सांगते की, शाळेत शिकलेल्या कोणत्याच गोष्टी मला आता आठवत नाहीत. पण, या पलीकडे माझ्या शाळेत पार पडलेले सोहळे, कलाक्षेत्राशी निगडीत सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आहेत. माझ्या वडिलांनी मला एकच गोष्ट सांगितली ती म्हणजे, तुम्ही खूप जास्त बुद्धिमान आहात असं खोटं भासवण्यापेक्षा चारचौघात मूर्ख ठरलेलं कधीही चांगलं. त्यामुळे मला कधीच खोटं बोलता आलं नाही. आजही देशाचे राष्ट्रपती कोण? असा प्रश्न मला विचारला जातो आणि मला त्या ट्रोलिंगचा फारसा फरक पडत नाही.”

हेही वाचा : आशुतोष गोवारीकर : ऑस्करवारी करणारा ‘लगान’ ते काळजाला भिडणारा ‘स्वदेस’! भारतीय सिनेमाला इतिहासाची जोड देणारा मराठमोळा दिग्दर्शक

नेपोटिझमचा ठपका पुसत झाली आघाडीची अभिनेत्री

भट्ट घराणं आणि करण जोहरचा वरदहस्त म्हणून आलियाला बॉलीवूडमध्ये एवढी मोठी संधी दिली गेली अशा चर्चा ‘स्टुडंट ऑफ द इयर’ प्रदर्शित झाल्यावर सर्वत्र रंगल्या होत्या. परंतु, २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हायवे’मुळे तिने हा समज अवघ्या दोन वर्षांतच खोटा ठरवला. आलियाने साकारलेली ‘वीरा’ खऱ्या अर्थाने ‘पटाखा गुड्डी…’ ठरली. ‘२ स्टेट्स’ मधली अनन्या असो, ‘हम्टी शर्मा…’ मधली काव्या प्रताप सिंग किंवा ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ मधली ‘वैदेही त्रिवेदी’. आता आलिया आधीसारखी केवळ ‘नेपोकिड’ नसून स्वत:चं वेगळं अस्तित्व निर्माण करत असल्याचं प्रत्येकाला जाणवत होतं. मधल्या काळात वेगवेगळ्या धाटणीच्या बहुरंगी भूमिका तिने साकारल्या. अखेर ‘राझी’मध्ये साकारलेल्या सेहमत खानने आलियाला नेपोटिझमचा टॅग पुसण्याची नामी संधी दिली अन् तिने देखील या संधीचं सोनं केलं. सेहमतच्या भूमिकेचं सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात आलं. यानंतर काही दिवसांतच तिला संजय लीला भन्साळींच्या ‘गंगूबाई काठीयावाडी’ या बिग बजेट सिनेमाची मुख्य अभिनेत्री होण्याची संधी मिळाली. लॉकडाऊन ओसरल्यावर सिनेमागृहात एकाही चित्रपटाचा निभाव लागत नसताना २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गंगूबाई’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. याचं श्रेय निश्चितच भन्साळींप्रमाणे आलियाचं देखील आहे.

आलिया-रणबीर अन् कपूर घराण्याची सून

आलिया एकीकडे स्वत:ला सिद्ध करत असताना दुसरीकडे तिच्या खऱ्या आयुष्यात हिरोची एन्ट्री झाली. फेब्रुवारी २०१८ मध्ये विमानप्रवासात आलिया-रणबीरची पहिली भेट झाली होती. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी ते एकत्र जात होते. यानंतर मे २०१८ मध्ये या दोघांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर एकत्र हजेरी लावली आणि इथूनच दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना सुरुवात झाली. सप्टेंबर २०१८ मध्ये कपूर कुटुंबीय ऋषी कपूर यांची तब्येत खालावल्याने उपचारासाठी न्यूयॉर्कला गेले होते. यावेळी आलिया सुद्धा रणबीरसह न्यूयॉर्कला होती. २०१९ मध्ये नीतू कपूर यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये रणबीर, आलिया, ऋषी कपूर आणि रिद्धिमा एकत्र दिसले होते. याच दरम्यान आफ्रिकेच्या घनदाट जंगलात रणबीरने तिला फिल्मी स्टाईलने लग्नाची मागणी घातली होती. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यावर २०२२ मध्ये रणबीर-आलिया साता जन्माचे सोबती झाले. या जोडप्याला आता राहा नावाची गोड मुलगी आहे.

लेकीच्या जन्मानंतर दमदार कमबॅक

राहाच्या जन्मानंतर बरोबर दीड महिन्यांनी आलियाने कामाला सुरुवात केली होती. याविषयी अभिनेत्री सांगते, “राहाच्या जन्मानंतर बरोबर ६ आठवड्यांनी मी व्यायाम करायला सुरुवात केली. कारण, “तुम क्या मिले…” या गाण्याच्या शूटिंगसाठी मला ४ महिन्यांत पुन्हा आधीसारखं दिसायचं होतं. राहा झाल्यावर सुरुवातीला मी अगदी हळूहळू व्यायाम केला. जास्त मेहनत घेतली नाही, स्वत:ला पूर्ण वेळ दिला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यायाम करताना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती काळजी घेतली. त्यानंतर माझं वजन कमी झालं.” राहाच्या जन्मानंतर अवघ्या ४ महिन्यांतच बर्फात शूट करताना आलियाला शिफॉन साड्या नेसायला लावल्या म्हणून करणने देखील पोस्ट शेअर करत तिचं कौतुक केलं होतं.

आलियाचा फिल्मी प्रवास योग्य दिशेने सुरू झाल्यावर तिने पुन्हा मागे वळून पाहिलं नाही. अभिनयात जम बसल्यावर वैयक्तिक आयुष्यात अभिनेत्रीने एक वेगळा प्रवास सुरू केला. याचं उत्तम उदाहरण सांगायचं झालं, तर २०२० मध्ये अभिनेत्री पलीकडची आलिया लोकांना उमगली कारण, स्वत:चा नवाकोरा ब्रॅन्ड लॉन्च करत तिने उद्योगक्षेत्रात पदार्पण केलं. याशिवाय २०२२ मध्ये ती निर्माती म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आली. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘डार्लिंग्स’ चित्रपटाची निर्मिती आलियाच्या ‘इटरनल सनशाइन प्रोडक्शन हाउस’कडून करण्यात आली होती. आता २७ सप्टेंबर २०२४ मध्ये या प्रोडक्शन हाउसची निर्मिती असलेला ‘जिगरा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा : ‘तुझे मेरी कसम’ म्हणत रितेश-जिनिलीया ‘असे’ झाले महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी!

दरम्यान, टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार आलिया भट्टची एकूण संपत्ती जवळपास ५५० कोटी आहे. सध्याच्या काळात बॉलीवूडमध्ये आलियाला सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखलं जातं. याशिवाय स्वत:चा व्यवसाय, प्रोडक्शन हाऊस, ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नामांकित कंपन्यांची जबाबदारी यामुळे आलिया आता करोंडोची मालकीण झाली आहे. अशा या प्रेमळ, बहुरंगी व्यक्तिमत्त्व असलेल्या आलियाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!