Alia Bhatt Entry in Tumbbad 2: ‘तुंबाड २’ सध्या त्यातील कलाकारांमुळे चर्चेत आला आहे. नवाजुद्दीन सिद्दिकीनंतर आणखी एका मोठ्या कलाकाराच्या नावाची घोषणा झाली आहे. या सिक्वेलमध्ये बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. ‘तुंबाड’ने भारतीय लोककथा आणि फँटसी या प्रकाराला एक नवी ओळख दिली. या चित्रपटाने पुन्हा प्रदर्शित झाल्यावर कमाईच्या बाबतीत विक्रम रचला. त्यानंतर निर्मात्यांनी दुसऱ्या भागाची घोषणा केली आणि आता त्याची स्टारकास्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

आता ‘तुंबाड २’ मध्ये आलिया भट्ट झळकणार आहे. आधी नवाजुद्दीन व नंतर आलियाची एन्ट्री यावरून निर्माते हा चित्रपट किती मोठ्या स्तरावर बनवत आहेत, याचा अंदाज येतो. विविध प्रकारच्या भूमिका समर्थपणे साकारण्यासाठी आणि धाडसी भूमिकांच्या निवडीसाठी ओळखली जाणारी आलिया भट्ट ‘तुंबाड 2’साठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. व्यक्तिरेखाप्रधान चित्रपटांपासून ते भव्य सिनेमॅटिक अनुभवांपर्यंत सहज वावरणाऱ्या आलियाने स्वतःला आपल्या पिढीतील सर्वाधिक प्रभावी अभिनेत्रींपैकी एक म्हणून सिद्ध केले आहे.

सोहम शाह, आलिया भट्ट व नवाजुद्दीन सिद्दिकी या तिन्ही कलाकारांच्या एकत्र येण्याने ‘तुंबाड’च्या विश्वात तीन वेगवेगळ्या सर्जनशील दृष्टिकोनांची भर पडणार आहे. सोहम शाह यांनी उभारलेले हे विश्व, नवाझुद्दीन सिद्दीकी यांची प्रभावी अभिनयशैली आणि आलिया भट्टची महत्त्वपूर्ण नवी भूमिका यामुळे ‘तुंबाड 2’मध्ये एक वेगळीच रंगत निर्माण होणार असून, मूळ चित्रपटाचा आत्माही कायम राखला जाणार आहे.

आलिया भट्टची प्रतिक्रिया चर्चेत

आलिया भट्ट म्हणाली, “‘तुंबाड’ मी पहिल्यांदा पाहिल्यापासून तो माझ्या मनात कायम आहे. इतकं वेगळं, समृद्ध आणि प्रेक्षकांना पूर्णपणे त्या विश्वात घेऊन जाणारं जग फारच कमी चित्रपट निर्माण करू शकतात. त्याहूनही कमी चित्रपट असे असतात, जे प्रदर्शित झाल्यानंतर अनेक वर्षांनीही लोकांच्या कल्पनाशक्तीत जिवंत राहतात. आता त्या विश्वाचा भाग होणं माझ्यासाठी खूप खास आहे. सोहम आणि नवाज या दोन्ही कलाकारांबरोबर काम करण्याची माझी अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. ती या समृद्ध, गूढ आणि अविस्मरणीय कथेतल्या एका महत्त्वाच्या भूमिकेच्या रुपाने पूर्ण होतेय, याचा मला आनंद आहे.”

सोहम शाह म्हणाले, “आलिया भट्टचं ‘तुंबाड 2’मध्ये स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होतोय. ती या पिढीतील सर्वाधिक प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना तिचा एक पूर्णपणे वेगळा आणि अनोखा अवतार पाहायला मिळेल. तिच्याबरोबर मी पहिल्यांदाच काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे.”

‘तुंबाड 2’ चे दिग्दर्शन आदेश प्रसाद करत आहे. हा चित्रपट ३ डिसेंबर २०२७ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.