Chetak Screen Awards 2026 Alia Bhatt : चेतक स्क्रीन अवॉर्डस २०२६ हा सोहळा ५ एप्रिल रोजी मुंबईत होणार आहे. या आगामी सोहळ्याच्या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. २०१८ च्या स्क्रीन अवॉर्डसमध्ये असाच एक मजेशीर किस्सा घडला होता. त्या सोहळ्यात अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता विक्की कौशल यांनी आपल्या विनोदी अंदाजाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते.
विकी कौशल आणि आलिया भट्ट हे दोघेही बॉलीवूडच्या सध्याच्या आघाडीच्या कलाकारांपैकी कलाकार आहेत. दोघांनी राझी या लोकप्रिय चित्रपटात एकत्र काम केले आहे. अशातच दोघे लवकरच ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
२०१८ च्या स्क्रीन अवॉर्डस सोहळ्यात एक खास भाग होता, ज्याचे नाव होते ‘Being Social with Kaushal’. विक्कीने अतिशय खास शैलीत आलियाचे स्टेजवर स्वागत केले. तो म्हणाला, “या वर्षी काही चित्रपटांनी नाव कमावले; तर काहींनी पैसा. पण राझी हा असा चित्रपट होता, ज्याने प्रेक्षकांचे प्रेम आणि आदर अशा दोन्ही गोष्टी मिळवल्या. आता मी स्टेजवर अशा अभिनेत्रीला आमंत्रित करतोय, जिच्याबरोबर मला काम करण्याचे भाग्य मिळाले आणि ती म्हणजे आलिया भट्ट..”
पुढे आलियाने एक खास परफॉर्मन्स केला आणि या परफॉर्मन्सनंतर तिने विकीबरोबर ‘Being Social with Kaushal’ हा सेगमेंट केला. यावेळी विक्कीबरोबर गप्पा मारताना ती गमतीने म्हणाली होती, “मला असं का वाटतंय की, इथे माझी चौकशी होणार आहे?” विक्कीने हसत उत्तर दिले, “तुम्ही आज एका नवीन शोमध्ये आला आहात, ज्याचं नाव आहे ‘Being Social with Kaushal’. मग पुढे त्याने अभिनेत्रीला काही मजेशीर प्रश्न विचारले.
पहिला प्रश्न होता, “चहा बनवण्यासाठी लागणाऱ्या पाच गोष्टी सांग”. त्यावर आलियाने उत्तर दिले, “चहापत्ती, आलं, साखर, दूध आणि कधी कधी… पाणी.” शेवटचं ‘पाणी’ हे तिला प्रेक्षकांमध्ये बसलेल्या दीपिका पादुकोणने आठवण करून दिले. हे पाहून सगळेच हसले.
त्यानंतर विक्कीने विचारले, “शरीरावर टॅटू कुठे काढतात, अशा जागा सांग.” आलियाने लगेच उत्तर दिलं, “मान, पाठ, खांदा व मनगट.” पुढे विक्कीने आलियाला चेहऱ्यावरील वेगवेगळे भाव दाखवायला सांगितले. आलियाने लगेच आनंद, दुःख, आश्चर्य, तिरस्कार व आजारी असे भाव दाखवीत सर्वांना हसवले.
त्यानंतर तिला फोटोशूटमधील पाच वेगवेगळ्या पोजेसही दाखवायला सांगितले गेले. यावेळी आलियाने मजेत दीपिका पादुकोण आणि प्रियांका चोप्राच्या सिग्नेचर फोटो पोजची नक्कल केली. शेवटी आलियाला बॉलीवूडमधील पाच लोकप्रिय डान्सच्या हुकस्टेप्स करण्यास सांगितले. त्यात रणबीर सिंहच्या ‘राम-लीला’ चित्रपटातील ‘तत्तड तत्तड’ गाण्याची स्टेप होती. ती स्टेप करताना आलिया आणि विक्कीने गमतीने त्या स्टेपला ‘डँड्रफ स्टेप’ म्हटले. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला.
