Ramayana Movie Teaser : लोकप्रिय अभिनेता रणबीर कपूरच्या ‘रामायण’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात अनेक प्रसिद्ध कलाकारांची वर्णी लागली आहे. काल ३ जुलै रोजी चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रा यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून या चित्रपटाचा टीझर व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानंतर सोशल मीडियासह सर्वत्र या चित्रपटाची चर्चा होताना दिसतेय.
‘रामायण’ चित्रपटात लोकप्रिय अभिनेता रणबीर कपूर रामाची भूमिका साकारणार आहे. त्याच्यासह या चित्रपटात रावणाच्या भूमिकेत प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता यश झळकणार आहे. तर, दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी ही सीतेची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा पहिला भाग २०२६ रोजी दिवाळीदरम्यान प्रदर्शित होणार आहे आणि दुसरा भाग २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये त्याबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे. अशातच चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता रणबीर कपूरची बायको व लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्टनेसुद्धा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून या चित्रपटासंदर्भात पोस्ट शेअर करीत, ती यासाठी उत्सुक असल्याचे म्हणत चित्रपटाचे कौतुक केले आहे.
अभिनेत्रीने नवऱ्याच्या चित्रपटाचे कौतुक करीत त्याला पाठिंबा दिला आहे. आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून या चित्रपटाचा टीझर व्हिडीओ पोस्ट करीत त्याच्या कॅप्शनमध्ये म्हटले, ‘काही गोष्टींना शब्दांची गरज नसते. ही एका अविस्मरणीय गोष्टीची सुरुवात आहे.’ त्याखाली अभिनेत्रीने दिवाळी २०२६ वाट पाहतेय, असे लिहीत ती चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे.
अभिनेत्रीच्या या कॅप्शनमधून ती तिच्या नवऱ्याचा आगामी चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहे. तर आलियाच्या या पोस्टखाली अनेक कलाकार मंडळींनी कमेंट्स केल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी चित्रपटात रणबीर कपूरसह महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता रवी दुबे यानेसुद्धा इमोजी पोस्ट करीत कमेंट केली आहे. रवी दुबे हा हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता आहे. रवी या चित्रपटात लक्ष्मणाच्या भूमिकेत झळकणार आहे.
‘रामायण’ या आगामी चित्रपटात रणबीर कपूर, साई पल्लवी, यश यांच्यासह मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे भरतच्या भूमिकेतून झळकणार आहे. तर चित्रपटात रामाचे वडील राजा दशरथ यांची भूमिका प्रसिद्ध अभिनेते अरुण गोविल साकारणार आहेत. त्याव्यतिरिक्त ‘रामायण’ चित्रपटातून अभिनेता सनी देओल, काजल अग्रवाल, लारा दत्ता, रकुल प्रीत सिंह हे कलाकारसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळकणार आहेत. त्यामुळेच कलाकार मंडळींसह प्रेक्षकांमध्येही या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.