Alia Bhatt Remembers Aishwarya Rai in Cannes 2026 : कान्स फिल्म फेस्टिवल सुरू झाला असून, बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या लूकची जोरदार चर्चा आहे. यशाच्या शिखरावर असलेल्या आलियाने पहिल्या दिवसापासून कान्समध्ये रेड कार्पेट गाजवले. आलिया भट्टने पाच आयकॉनिक लूक करून सर्वांना आकर्षित केले. एकीकडे सोशल मीडियावर आलिया भट्टचे कौतुक केले जात आहेत; तर दुसरीकडे अभिनेत्री ऐश्वर्या राय हिला वगळण्यात आल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. L’Oréal पॅरिस या ब्रॅण्डची ग्लोबल ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून ऐश्वर्या दोन दशके कान्स रेड कार्पेटवर झळकली आहे. मात्र, यावेळी डावलल्याची भावना चाहत्यांनी व्यक्त करताच आलिया भट्टने एका मुलाखतीमध्ये ऐश्वर्या रायचा उल्लेख केला आहे.
आलिया भट्टचा खास लूक
बुधवारी रात्री L’Oréal पॅरिसच्या खास डिनर नाईटमध्ये आलिया भट्ट सहभागी झाली होती. यावेळी आलिया आणि लोकप्रिय F1 ड्रायव्हर चार्ल्स लेक्लेअर यांची भेट लक्षवेधी ठरली. सोशल मीडियावर याचे तुफान व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यावेळी तिने नेटेड डिटेल असलेला फिकट निळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता.
मिनिमल मेकअपसह आलियाने प्रिसेन्स स्टाईल गाऊन घातला होता. यावेळी तिने नेकलेस म्हणून निळी लेस आणि मिनिमल ज्वेलरी स्टाईल केली होती. तिने घातलेल्या दोन ब्ल्यू डायमंड रिंगसुद्धा लक्षवेधी ठरत होत्या.
आलियाने सांगितली ऐश्वर्या रायची आठवण
यावेळी ब्रिटिश व्होगला दिलेल्या मुलाखतीमध्ये आलिया भट्टने बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचा उल्लेख केला. त्यामध्ये आलिया भट्टला आतापर्यंत कान्समधील सर्वांत आयकॉनिक लूक कोणता वाटतो, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने ऐश्वर्या राय बच्चनचा उल्लेख करीत उत्तर दिले. आलिया म्हणाली की, माझ्या आठवणीमध्ये आतापर्यंत सर्वांत जास्त आयकॉनिक लूक हा ऐश्वर्या राय बच्चनचा आहे. तिने देवदास प्रीमियरवेळी केलेला लूक माझ्या लक्षात राहिला. तिची सुंदर नक्षीदार साडी आणि तिची शैली आयकॉनिक होती, अशी आठवण आलिया भट्टने सांगितली.
ऐश्वर्या रायला कान्समधून वगळल्याचे नेटकऱ्यांचे आरोप
या वर्षी कान्समध्ये L’Oréal पॅरिस या ब्रॅण्डची ग्लोबल ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून आलिया भट्ट झळकत आहे. मात्र, गेली अनेक वर्षे ऐश्वर्या राय बच्चन रेड कार्पेटवर ब्रँडचे प्रतिनिधित्व करीत होती. यापूर्वी दरवर्षी मार्टिनेज हॉटेलवरील पोस्टमध्ये ऐश्वर्या रायचा खास फोटो लावला जात होता. या वर्षी इतर जागतिक अभिनेत्री आणि मॉडेलसह आलिया भट्टचा फोटो लावण्यात आला आहे. मात्र, ऐश्वर्या राय बच्चनला वगळल्यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी ट्रोल करत असे डावलणे चुकीचे असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता आलिया भट्टने कान्स फेस्टिवलमध्ये ऐश्वर्या राय बच्चनचा मुलाखतीमध्ये उल्लेख केला आहे.
