आलिया भट्ट आणि सद्गुरू यांच्यातील संवादाचा पूर्ण व्हिडीओ आता सद्गुरूंच्या युट्यूब चॅनेलवर प्रसारित झाला आहे. या व्हिडीओमध्ये आलियाने भीती, अपयश आणि मातृत्वाविषयी मोकळेपणाने भाष्य केलं. आलियाने खुलासा केला की तिची साडेतीन वर्षांची मुलगी राहा हिला आत्तापासूनच अपयशाची भीती वाटते. यावेळी आलियाने पालकत्वाविषयी सल्लाही मागितला, ज्यावर सद्गुरूंनी दिलेल्या उत्तरांमुळे ती हसू लागली.
आलिया म्हणाली, “मी एका साडेतीन वर्षांच्या मुलीची आई आहे. माझी लेक माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद आहे. पण मला सतत काळजी वाटत असते. माझ्या वडिलांनी मला एकदा विचारलं होतं की आई होणं कसं असतं? मी त्यांना सांगितलं की आईपण आनंद आणि काळजी या दोन्हीचं मिश्रण आहे. मी सतत विचार करत असते की—मी एक चांगली आई आहे का? मी योग्य गोष्टी बोलतेय का? आजच्या काळात मला किंवा इतर पालकांना तुमचा काय सल्ला असेल? कारण मुलं खूप सुंदर आणि जिज्ञासू असतात आणि सुरुवातीच्या काही वर्षांत ती पालकांकडूनच जीवन जगायला शिकतात.”
यावर सद्गुरूंनी मिश्किलपणे विचारलं, “पण जर आईवडील चांगले नसतील तर?”—हे ऐकताच सर्वजण हसू लागले. आलिया पुढे म्हणाली, “मला वाटत नाही की मातृत्वातून काळजी ही गोष्ट वेगळी होऊ शकते. तुम्हालाही हे मान्य करावं लागेल.”
सद्गुरूंनी सांगितला स्वतःचा अनुभव
स्वतःचा अनुभव सांगत सद्गुरू म्हणाले, “मला मुलगा नसून मुलगी आहे, याचा मला खूप आनंद आहे. जेव्हा मी १० वर्षांचा होतो, तेव्हा मी खूप धोकादायक गोष्टी करायचो. मला नेहमी वाटायचं, जर माझ्या मुलानेही असंच केलं तर मी त्याला कसं सांभाळेन? सुदैवाने, माझ्या मुलीने कधीही माझ्यासारख्या गोष्टी केल्या नाहीत.”
सद्गुरूंनी काय सल्ला दिला?
पुढे म्हणाले, “जेव्हा तुम्हाला मूल होतं, तेव्हा सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला त्यांना काहीतरी शिकवायचंय हा विचार मनातून काढून टाका. तुमच्यामध्ये आणि तुमच्या साडेतीन वर्षांच्या मुलीमध्ये—तिचं नाव काय?” आलियाने “राहा” असं सांगितलं. सद्गुरू पुढे म्हणाले, “तुझ्या आणि तिच्यापैकी जास्त आनंदी कोण आहे?” आलियाने राहाचं नाव घेतलं. मग सद्गुरूंनी विचारलं, “मग आयुष्याचा सल्लागार (कन्सल्टंट) कोण असायला हवं?” आलिया हसत म्हणाली, “ती.” यावर सद्गुरू म्हणाले “मग तुला तिला शिकवण्यासाठी काय उरलंय? तुम्ही मुलांचं निरीक्षण केलं पाहिजे, त्यांचं ऐकलं पाहिजे—कारण मुलं तुमच्यापेक्षा जीवनाच्या जास्त जवळ असतात.”
यावेळी ‘अपयशाची भीती’ या विषयावरही चर्चा झाली. आलिया भट्ट म्हणाली, “आपल्या सर्वांनाच अपयशाची भीती वाटते. आता माझी मुलगी मोठी होतेय, पण तिला नेहमी यशस्वी व्हायचंय. जर इतर कोणी पहिलं आलं, तर ती म्हणते की त्यांनी चिटिंग केली आहे. मग मी तिला सांगते—नाही, खरोखरच त्यांचा पहिला क्रमांक आलाय.” त्यानंतर सद्गुरू गंमत करत म्हणाले, “मी तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडेन,” ज्यावर आलिया हसून म्हणाली, “नक्कीच, मला वाटतं रडणं आरोग्यासाठी खूप चांगलं असतं.”
