श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूरचा ‘तू झुठी मै मक्कार’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून श्रद्धा आणि रणबीर ही फ्रेश जोडी प्रथमच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. लव रंजन दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. तरुण पिढीचे प्रेमाबद्दलचे विचार आणि प्रेमाकडे बघायचा दृष्टिकोन यावर चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे.
रोमॅंटिक कॉमेडी धाटणीच्या या चित्रपटाचं ‘तेरे प्यार में’ हे फ्रेश गाणंसुद्धा नुकतंच प्रदर्शित झालं आहे. अरिजित सिंगच्या आवाजातील हे गाणं लोकांना चांगलंच आवडलं आहे, शिवाय यात श्रद्धा आणि रणबीरमधील केमिस्ट्रीसुद्धा प्रेक्षकांना आवडली आहे. यामधील श्रद्धाचा बोल्ड अंदाज आणि रणबीरचा डान्सही लोकांच्या पसंतीस पडला आहे. या गाण्याच्या माध्यमातून सध्या श्रद्धा कपूर या चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसत आहे.
आणखी वाचा : “शाहरुख खान हा भारताचा टॉम क्रूझ…” अमेरिकी पत्रकाराच्या वक्तव्यावर किंग खानचे चाहते नाराज
या गाण्यावर एक रील शेअर करत श्रद्धाने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला होता, आता पुन्हा त्याच गाण्यावर आलिया भट्टने रील बनवून शेअर करत श्रद्धाच्या रीलला उत्तर दिलं आहे. अलिया ट्रेडमिलवर चालत आहे अन् मागे ‘तेरे प्यार में’ हे गाणं ऐकायला मिळत आहे. शिवाय या पोस्टमध्ये “सध्या तरी मी कार्डियोच्या प्रेमात आहे” असं आलियाने लिहिलं आहे.
आलियाने चित्रपटाचं केलेलं प्रमोशन पाहून श्रद्धा चांगलीच खुश झाली आहे. श्रद्धा आलियाचं हे रील शेअर करत म्हणाली, “तू खूपच गोड आहेस.” शिवाय रणबीरनेही सोशल मीडियावर यावं असा टोमणाही श्रद्धाने मारला आहे. ‘तू झुठी मै मक्कार’ हा चित्रपट ८ मार्चला प्रदर्शित होणार आहे. चाहते रणबीर आणि श्रद्धा यांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत.