Alia Bhatt’s Alpha Rejects OTT Deal : हल्ली गुप्तहेरपट, थ्रिलर, रहस्यमय व भय अशा धाटनीच्या कथानकाला खूप महत्त्व आहे. प्रेक्षकांमध्ये या चित्रपट आणि वेब सीरिजबद्दल उत्सुकता असते. अलीकडे अशा धाटनीचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. ‘धुरंधर’ हा त्यापैकीच एक. काही दिवसांपासून यशराज प्रॉडक्शनची निर्मिती असलेला ‘अल्फा’ हा चित्रपटही त्यामुळे चर्चेत आहे.

‘अल्फा’ चित्रपटात आलिया भट्ट व शर्वरी वाघ मुख्य भूमिकांमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्याशिवाय यामध्ये बॉलीवूड अभिनेता बॉबी देओलही महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. खरं तर हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होणार होता; परंतु काही तांत्रिक कारणांमुळे चित्रपट प्रदर्शित करण्याची तारीख बदलण्यात आली. मात्र, आता काही दिवसांपासून आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित न होता, ओटीटीवरच रीलीज होणार, अशी चर्चा होती.

आलिया भट्टचा ‘अल्फा’ थिएटरमध्ये रीलीज न होता, ओटीटीवर रीलीज होणार असल्याच्या चर्चेमुळे आलिया व निर्मात्यांमध्ये वाद झाल्याच्या अफवाही पसरल्या होत्या. २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जिगरा’ चित्रपटानंतर आलियाचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. त्यामुळे ‘अल्फा’ सिनेमागृहांत प्रदर्शित होणं तिच्यासाठी तशी महत्त्वाची गोष्ट आहे. ‘मुंज्या’ चित्रपटामुळे लोकप्रियता मिळवलेली शर्वरी वाघसुद्धा चित्रपटामध्ये बॉलीवूडमधील आघाडीच्या कलाकारांबरोबर झळकणार आहे. आलिया-शर्वरी यामधून पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्येही या दोघींना एकत्र पाहण्यासाठी उत्सुकता आहे.

नाकारला कोट्यवधींचा करार

‘अल्फा’च्या ओटीटी कराराबद्दल बोलायचं झालं, तर ‘व्हरायटी इंडिया’च्या अहवालानुसार यशराज प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या ‘अल्फा’ला नेटफ्लिक्सने २१५ कोटींचा ओटीटी करार करण्याची ऑफर दिली होती. परंतु, ‘अल्फा’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित न होता, थेट ओटीटीवर रीलीज करण्यासाठी मिळालेली ऑफर निर्मिती संस्थेनं नाकारली असून, हा सिनेमा चित्रपटगृहांतच प्रदर्शित होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

निर्मिती संस्थेनं या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया देत म्हटलं, ” ‘अल्फा’ला आम्ही खूप खास बनवत आहोत. त्यामध्ये देशातील टॉपच्या अभिनेत्री आहेत. आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असून, यामध्ये शर्वरी वाघही महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळकणार आहे. आम्ही खूप चांगला चित्रपट बनवला आहे आणि आम्हाला आशा आहे की, प्रेक्षकांनाही हा चित्रपट खूप आवडेल.

‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

दरम्यान, ‘अल्फा’बद्दल बोलायचं झालं, तर हा चित्रपट लवकरच रीलिज होणार आहे. येत्या १७ एप्रिलमध्ये हा चित्रपट सिनेमागृहांत प्रदर्शित होत आहे. याच दिवशी सलमान खानचा ‘बॅटल ऑफ गलवान’ हा चित्रपट रीलीज होणार आहे.