BAFTA Awards 2026, Alia Bhatt begins her speech in Hindi : लंडनमध्ये रविवारी रात्री ‘ब्रिटिश अकादमी फिल्म अवॉर्ड्स’ अर्थात ‘BAFTA’ पुरस्कार सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या समारंभाला जागतिक पातळीवरचे अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. यासह यंदा या सोहळ्याला भारतीय अभिनेत्री आलिया भट्टने देखील विशेष उपस्थिती लावली होती. ती या सोहळ्यात प्रेझेंटर म्हणून सहभागी झाली होती. आलियाच्या रेड कार्पेट लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अभिनेत्रीने यावेळी पांढऱ्या रंगाच्या स्टोलसह सिल्व्हर GUCCI गाऊन घातला होता. मात्र, यावेळी नेटकऱ्यांनी आलियाचं एका वेगळ्याचं गोष्टीसाठी कौतुक केलं आहे. याचा व्हिडीओ सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे.

अभिनेत्री आलिया भट्टला पुरस्कार प्रेझेंट करण्यासाठी ‘बाफ्टा’च्या मंचावर आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी तिने स्टेजवर एन्ट्री घेताच सर्वांना “नमस्कार…” म्हणत अभिवादन केलं. आलिया ‘सर्वोत्कृष्ट नॉन-इंग्लिश फिल्म’ हा पुरस्कार प्रेंझेट करण्यासाठी बाफ्टाच्या रंगमंचावर आली होती.

आलिया रंगमंचावर एन्ट्री घेऊन हिंदी भाषेत संवाद साधत म्हणाली, “नमस्कार! पुढचा पुरस्कार एका अशा चित्रपटाला प्रदान करण्यात येणार आहे…जो चित्रपट इंग्रजी भाषिक नाहीये.”

यानंतर तिने या पुरस्काराचा अर्थ इंग्रजीत सुद्धा सांगितला आलिया म्हणाली, “सबटायटल्ससाठी सध्या घाई करू नका…कारण, मी हिंदीमध्ये आता हेच सांगितलं की पुढचा पुरस्कार अशा एका चित्रपटासाठी आहे जो इंग्रजी भाषिक सिनेमा नाहीये. कारण, चित्रपट अनेक विविध भाषांमध्ये तयार केले जातात पण, आपण सगळेच ज्यामुळे एकत्र जोडले गेलो आहोत ती असते सिनेमाची भाषा!…आणि आपण सर्वजण ही सिनेमाची भाषा खूप चांगल्याप्रकारे समजून घेतो.” यानंतर आलियाने विजेत्याचं नाव जाहीर केलं. ‘सेंटीमेंटल व्हॅल्यूज’ या चित्रपटाला यंदाचा ‘सर्वोत्कृष्ट नॉन-इंग्लिश फिल्म’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावर्षी हा सिनेमा ऑस्करसाठी देखील नामांकित झाला आहे.

आलियाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जागतिक पातळीवर रंगमंचावर एन्ट्री घेताच आलियाने हिंदी भाषेत संवाद साधल्याने सर्वांनी तिचं भरभरून कौतुक केलं आहे. “आम्हाला आलियाचा अभिमान आहे”, “आलिया तू खरंच सुपरस्टार आहेस”, “आलिया आमची क्वीन” अशा असंख्य प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत. यासह अनेकांनी तिच्या लूकचं सुद्धा कौतुक केलं आहे.

BAFTA Awards 2026: पुरस्कार प्रेझेंट करणारी तिसरी भारतीय अभिनेत्री

बाफ्टा सोहळ्यात प्रेझेंटर म्हणून अवॉर्ड सादर करणारी आलिया भट्ट ही तिसरी भारतीय अभिनेत्री ठरली आहे. याआधी ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा आणि बॉलीवूडची मस्तानी दीपिका पादुकोण या अभिनेत्रींनी ‘बाफ्टा’मध्ये विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले आहेत.

लेक राहाबद्दल आलिया काय म्हणाली?

आलिया ‘बाफ्टा’शी संवाद साधताना म्हणाली, “सध्या माझ्या आयुष्यात प्रेरणेचा आणि मॅजिकचा खरा स्त्रोत माझी मुलगी आहे. तिच्याकडे बघूनच माझं मन भरून जातं. आता ती तीन वर्षांची आहे…अनेकदा घरी माझ्या गाण्यांवर ती डान्स करत असते. माझ्यामते हेच खरं आयुष्य आहे.”

दरम्यान, आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, लवकरच ती ‘अल्फा’ आणि ‘लव्ह अँड वॉर’ या सिनेमांमध्ये झळकरणार आहे. या दोन्ही चित्रपटांची आलियाचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.