Alia Bhatt Recalls Her Nanny Death : आलिया भट्ट बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. अभिनेत्री सोशल मीडियावरही सक्रिय असते आणि अनेकदा ती खासगी आयुष्यातील घडामोडी, प्रसंग यांबद्दल समाजमाध्यमांशी संवाद साधताना दिसते. अशातच आता तिनं तिच्या आयुष्यातील एका कठीण काळाबद्दल सांगितलं आहे.

आलिया भट्ट व अमिताभ बच्चन यांनी नुकतच सडक सुरक्षा अभियानामध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी नियम न पाळल्यामुळे होणारे अपघात आणि त्यासंबंधित गोष्टींबद्दल जनजागृती याबद्दल चर्चा झाली. यावेळी आलिया भट्टने कार्यक्रमादरम्यान तिच्या आयुष्यातील एक वाईट आणि दु:खद अनुभव शेअर केला. यावेळी ती भावूकही झाली.

दी इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार आलिया भट्ट म्हणाली, “जेव्हा मी १२ वर्षांची होते तेव्हा माझ्या आयुष्यात एक स्त्री होती, जी माझ्या खूप जवळची होत. तुम्ही तिला माझा सांभाळ करणारी नॅनी म्हणू शकता; पण ती मला माझ्या बहिणीसारखी होती. तिचं नाव शारदा होतं. एका अपघातात आम्ही तिला गमावलं. ती तिच्या जोडीदाराबरोबर देवळात जात होती; पण तिनं हेल्मेट घातलं नव्हतं. तिच्या जोडीदारानं हेल्मेट घातलेलं. म्हणून जेव्हा ट्रकनं धडक दिली तेव्हा तिचा जागेवरच मृत्यू झाला.”

आलिया याबद्दल पुढे म्हणाली, “त्या अपघातानंतर आमच्या घरात भीती निर्माण झालेली की, कधीही कोणाहीबरोबर असं घडू शकतो. माझी आई घाबरलेली आणि तिला माझी काळजी वाटत होती. तिनं ड्रायव्हरला ताकीद देऊन ठेवलेली, की मी गाडीत सीटबेल्ट लावलेला नसताना गाडी चालवली, तर कामावरून काढून टाकेन; ण मी नेहमी सीटबेल्ट लावायचे. आता आई झाल्यानंतर माझा दृष्टिकोन बदलला. मला सुरक्षा किती महत्त्वाची आहे याची जाणीव झाली.”

दरम्यान, आलिया भट्ट अनेकदा तिच्या कुटुंबीयांबद्दल बोलत असते. तिची बहीण, नवरा, मुलगी यांच्याबरोबरचे अनेक किस्से ती मुलाखतींमधून सांगत असते. आलियाच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती येत्या काळात ‘लव्ह अँड वॉर’ व ‘अल्फा’ या चित्रपटांतून झळकणार आहे.