Alka Yagnik Health Update : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवार, २३ जून रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे आयोजित दुसऱ्या नागरी सत्कार समारंभात उर्वरित पद्म पुरस्कार प्रदान केले. यावेळी ज्येष्ठ गायिका अलका याज्ञिक यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारल्यानंतर अलका यांनी सोशल मीडियावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी त्यांनी शेअर केलेल्या फोटोंसह प्रकृतीचा उल्लेख केल्यामुळे अलका याज्ञिक यांना नक्की काय झाले आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. त्या दोन वर्षांपासून सार्वजनिक आयुष्यापासून दूर का होत्या, याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
अलका याज्ञिक यांना पद्मभूषण पुरस्कार
ज्येष्ठ पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी इन्टाग्रामवर पोस्ट करीत भावना व्यक्त केल्या आहेत. हा करिअरमधील सर्वोच्च आनंद देणारा क्षण असल्याचे अलका म्हणाल्या आहेत. त्यांनी लिहिले आहे, “दोन वर्षांपासून प्रसिद्धी, सार्वजनिक कार्यक्रमांपासून लांब राहिले आहे. कोणालाही माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगत नाहीये. कारण- मी आरोग्याशी संबंधित कठीण काळातून जात आहे आणि याची माहिती अनेकांना आहे. या काळात प्रेक्षकांचे प्रेम, प्रार्थना, आणि पाठिंबा माझ्या पाठीशी कायम राहिला आहे.
“हा पुरस्कार चाहते व श्रोत्यांचा…” – अलका
देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी मी खूप दिवसांनी घराबाहेर पडले, तेव्हा माझे मन कृतज्ञतेने भरलेले होते. या पुरस्कारावर माझे नाव असले तरी तो माझ्या प्रत्येक चाहत्याचा आहे. प्रत्येक श्रोत्याचा हा पुरस्कार आहे, ज्यांनी माझ्या आवाजाला त्यांच्या आयुष्यात स्थान दिले, माझी गाणी पिढ्यान् पिढ्या जपली आणि माझ्या आनंदाच्या, तसेच कठीण काळातही ते कायम माझ्या पाठीशी उभे राहिले. या सर्वांचा या सन्मानात तितकाच वाटा आहे.”
आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करतीये – अलका
पुढे अलका याज्ञिक यांनी लिहिले आहे, “हा क्षण माझ्यासाठी खूप खास आहे. कारण- हा केवळ कामाचा सन्मान नाही, तर कठीण परिस्थितीतही खंबीरपणे उभे राहण्याच्या इच्छाशक्तीची जाणीव करून देणारा क्षण आहे. मी हळूहळू सावरत असून, आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मला स्वतःला जायचे होते. कारण- हा पुरस्कार फक्त माझ्यासाठी नाही, तर या प्रवासात माझ्यासह राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी तो स्वीकारायचा होता. हा महत्त्वपूर्ण सन्मान प्रदान केल्याबद्दल भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्रालय आणि भारत सरकार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. अत्यंत नम्रतेने आणि आदराने हा सन्मान स्वीकारते.”
चाहत्यांनी अलका याज्ञिक यांच्या प्रकृतीबाबत व्यक्त केली चिंता
अनेक वर्षांपासून प्रेक्षकांनी दिलेले प्रेम, आपुलकी, प्रार्थना आणि माझ्यावर दाखवलेला विश्वास यासाठी सर्वांची मी मनापासून आभारी आहे. हे सगळे प्रेम मी कायम माझ्यासोबत जपून ठेवेन. आज फक्त एक पुरस्कारच स्वीकारला नाही, तर माझ्या या प्रवासाचा भाग असलेल्या लाखो चाहत्यांचे प्रेम आणि आशीर्वादही अनुभवले,” अशी भावनिक पोस्ट पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांनी केली आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते अलका याज्ञिक हा पुरस्कार स्वीकारतानाचे व्हिडीओ समोर आले आहेत. यावेळी त्यांना एका सहायकाने मंचापर्यंत नेले आणि मग त्यांनी आदराने तो पुरस्कार स्वीकारला. त्यामुळे चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
अलका याज्ञिक ‘या’ आजाराने ग्रस्त
ज्येष्ठ पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना कानाचा त्रास होत आहे. काही काळापासून त्या ‘सेन्सोरिन्युरल हिअरिंग लॉस’ (SNHL) या कानाच्या दुर्मीळ आजाराने ग्रासल्या आहेत. २०२४ मध्ये त्यांनी जाहीरपणे पोस्ट करून याबद्दलची माहिती चाहत्यांना दिली होती. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती. व्हायरल संसर्गामुळे उद्भवणाऱ्या या समस्येमुळे ऐकू येणे कमी होते. विमानातून बाहेर पडत असताना अचानक अलका याज्ञिक यांना पूर्णपणे ऐकू येणे बंद झाल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली होती.
