Alpha Box Office Collection Day 1: आलिया भट्टचा बहुचर्चित व बहुप्रतिक्षित ‘अल्फा’ चित्रपट अखेर शुक्रवारी, ४ जुलै रोजी रिलीज झाला. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील हा नवीन चित्रपट आहे. घोषणेपासूनच चर्चेत असलेल्या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई मात्र फार चांगली झालेली नाही. शर्वरी व आलियाच्या अल्फाने बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात केली आहे.
अल्फाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन
पहिल्या दिवशी थिएटर्समध्ये प्रेक्षकांची एकूण ऑक्युपन्सी २०.४०% होती. यामध्ये सकाळच्या शोजसाठी ९.९२%, दुपारच्या शोजसाठी १७.८५%, संध्याकाळच्या शोजसाठी १९.६९% आणि रात्रीच्या शोजसाठी सर्वाधिक ३४.१५% ऑक्युपन्सी होती. इंडस्ट्री ट्रॅकर ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या आकडेवारीनुसार, अल्फाने पहिल्या दिवशी देशभरातील ७,५३४ शोजमधून फक्त ९ कोटी रुपयांची कमाई केली. परदेशात या चित्रपटाने ५ कोटी रुपये कमावले. त्यामुळे अल्फाची जगभरातील एकूण कमाई १५.८० कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
आलिया भट्टच्या जिगरापेक्षा अल्फाची ओपनिंग चांगली
‘अल्फा’ने आलिया भट्टच्या याआधीच्या ‘जिगरा’ चित्रपटापेक्षा जास्त ओपनिंग केली आहे. वासन बाला दिग्दर्शित ‘जिगरा’ या ॲक्शन-थ्रिलर चित्रपटाने भारतात पहिल्या दिवशी ४.५५ कोटी रुपये कमावले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. ८० कोटींपेक्षा जास्त बजेट असलेल्या या चित्रपटाला फक्त ५६.९३ कोटी रुपयांचीच कमाई करता आली होती. दरम्यान, ‘अल्फा’ चित्रपटाला सध्या इतर नवीन चित्रपटांकडून मोठं आव्हान आहे. यात अक्षय कुमारचा ‘वेलकम टू द जंगल’ आणि इम्तियाज अलीचा ‘मै वापस आऊंगा’ या चित्रपटांचा समावेश आहे.
यशराजच्या स्पायव्हर्समधील चित्रपटांचा विचार केल्यास, ‘अल्फा’ची पहिल्या दिवसाची सुरुवात सर्वात कमी मानली जात आहे. याआधी रिलीज झालेले ‘पठाण’, ‘वॉर २’, ‘वॉर’ आणि ‘टायगर’ सीरिजमधील चित्रपटांनी पहिल्याच दिवशी बंपर कमाई केली होती, कारण ते सर्व चित्रपट वीकेंडच्या आधी सुट्टीच्या दिवशी रिलीज झाले होते.
‘अल्फा’ हा वायआरएफ स्पाय युनिव्हर्समधील सातवा चित्रपट आहे. तसेच हा या फ्रँचायझीमधील पहिलाच महिलाकेंद्रित चित्रपट आहे. शिव रवाईल दिग्दर्शित या स्पाय-थ्रिलर चित्रपटात शर्वरी, बॉबी देओल आणि अनिल कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
