Alpha official Teaser Out : बॉलीवूडच्या बहुचर्चित व बहुप्रतीक्षित ‘अल्फा’ चित्रपटाचा टीझर आऊट झाला आहे. अभिनेत्री आलिया भट्ट हिची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट जोरदार चर्चेमध्ये आला. अॅक्शन, थ्रिलर असलेल्या अल्फा चित्रपट एक स्पाय युनिव्हर्स असणार आहे. त्यामध्ये आलियासह बॉबी देओल, अनिल कपूर व शर्वरी वाघ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘अल्फा’ चित्रपटाच्या टीझरमधून महिला गुप्तहेराचे मिशन आणि हाय-ऑक्टेन अॅक्शन थरार पाहायला मिळत आहे. टीझरमधील आलिया भट्टच्या खास लूक व अॅक्शन सीन्सचे कौतुक होत असले तरी आणखी एका कलाकाराने लक्ष वेधले आहे, ती म्हणजे मराठमोळी बालकलाकार खुशी हजारे.

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय बालकलाकार खुशी हजारे हिच्या अभिनयाचा मोठा चाहतावर्ग आहे. खुशीने अनेक चित्रपट व मालिकांमध्ये बालकलाकार म्हणून भूमिका साकारल्या आहेत. त्यामध्ये तिचा सर्वांत जास्त गाजलेला चित्रपट ‘वेड’. रितेश देशमुख यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘वेड’ चित्रपटामध्ये खुशीने जिया शंकर अर्थात निशाच्या मुलीचे पात्र साकारले होते.

खुशी हजारे हिची ‘अल्फा’ चित्रपटामध्ये लक्षवेधी भूमिका

‘वेड’ या चित्रपटातील तिची भूमिका लक्षवेधी ठरली होती आणि तिच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक करण्यात आले. ‘वेड’मधील अभिनयासाठी खुशीला ‘फिल्मफेअर मराठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार’ मिळाला होता. या भूमिकेमुळे चर्चेत आलेली मराठी बालकलाकार खुशी हजारेने ‘अल्फा’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. खुशी हजारे हिने ‘अल्फा’ या चित्रपटामध्ये आलिया भट्टच्या लहानपणीचे पात्र साकारले आहे.

‘अल्फा’च्या टीझरमध्ये झळकली खुशी हजारे

‘अल्फा’च्या टीझरमध्ये खुशी खास लूकमध्ये दिसून येत असून, गुप्तहेर बनण्यासाठी ट्रेनिंग घेत असल्याचे दिसत आहे. बॉबी देओलने आलियाच्या वडिलांचे पात्र साकारले आहे. लहानपणापासून तिला स्पायचे ट्रेनिंग देताना दाखवण्यात आले आहे. यावेळी खुशीने केलेला अभिनय लक्षवेधी ठरत आहे. त्यामध्ये बॉक्सिंग, नेमबाजी आणि स्वरक्षणाचे ट्रेनिंग घेत आहे. त्याचबरोबर खुशीच्या हातावर ‘अल्फा’चे खास ‘ए’ (a) हे निशाणा कोरल्याचे दाखविण्यात आले आहे. स्पा म्हणून ट्रेनिंग घेताना ती वडिलांना अनेक प्रश्न आणि त्याची कारणे विचारत असल्याचे दिसून येत आहे. सैनिकी वेशभूषेमध्ये बालकलाकार खुशी हजारेचा दमदार आणि आत्मविश्वासपूर्ण अंदाज पाहायला मिळाला आहे.

अल्फा चित्रपटाची रिलीज डेट आली समोर

‘यश राज फिल्म्स’ची निर्मिती असलेल्या ‘अल्फा’ या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा यांनी केली असून, शिव रवैल यांनी दिग्दर्शन केले आहे. येत्या ३ जुलै २०२६ रोजी ‘अल्फा’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील ‘स्पाय युनिव्हर्स’मध्ये एका तरुणीची थरारक गोष्ट मांडण्यात आली आहे. त्या तरुणीला लहानपणापासून एक मिशनचे ट्रेनिंग दिले जात असून, तिचे संगोपन मुळात ‘हत्या करण्यासाठी’ झाले आहे. ‘अल्फा’ हा स्त्री पात्रांवर आधारित ॲक्शन चित्रपट असून, तो रोमांचक अॅक्शन सिनेमा असणार आहे.