गायक किती पैसे कमावतात? याबद्दल प्रेक्षकांमध्ये कायम उत्सुकता पाहायला मिळते. बिग बॉस फेम गायक अमाल मलिकने एकदा स्वतःच याबद्दल खुलासा केला होता. अमाल मलिक हा एक लोकप्रिय गायक व यशस्वी संगीतकार आहे. त्याने बॉलीवूडला अनेक गाजलेली गाणी दिली आहेत. अमाल मलिक गाण्यांबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. अमाल मलिकने एकदा तो एका रात्रीत किती पैसे कमावतो व किती खर्च करतो, याबद्दल सांगितलं होतं. त्याने सांगितलेले आकडे ऐकल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
अमाल मलिकने सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या आर्थिक व्यवहारांबाबत सांगितलं होतं. शाळेत असल्यापासून अमाल अकाउंट्समध्ये हुशार होता. त्याच्या पैशांचे व्यवस्थापन तो स्वतः करतो, पण त्याची पैसे खर्च करण्याची पद्धत त्याच्या आईला अजिबात आवडत नाही. “माझ्या आईचं पैशांशी खूप वेगळं नातं आहे. माझं जेवणाचं बिल २० हजार का आहे किंवा मी अचानक एकाच दिवसात एक लाख रुपये का खर्च केले, हे तिला कधीच समजणार नाही. मी पैसे कशावर खर्च करतो त्याबाबत वडिलांना सर्व माहिती देतो. मात्र आईला सांगताना काळजी घ्यावी लागते, कारण ती माझ्या खर्चांमुळे नाराज असते,” असं अमाल मलिकने सांगितलं.
मी खूप पैसे खर्च करतो – अमाल मलिक
पैशांबद्दलची अमालची मानसिकता त्याच्या आईपेक्षा खूप वेगळी आहे. काही खास निमित्त असेल तेव्हा अमला स्वतःला पैसे खर्च करण्यापासून रोखत नाही. “कधीकधी एखाद्या इव्हेंटनंतर मी पार्टीला जातो किंवा मी माझ्या टीममधील लोकांना बाहेर घेऊन जातो, त्यावेळी मी खूप पैसे खर्च करतो. त्या बाबतीत मी खूप मोठ्या मनाचा आहे. आपण पैसे साठवून ठेवायला हवे, असं मला वाटत नाही. मला वाटतंय की पैसे कमावले आहेत तर ते खर्च करायलाच हवे,” असं मत अमाल मलिकने व्यक्त केलं.
अमालच्या आईचा पैशांबद्दलचा दृष्टिकोन वेगळा आहे, कारण तिने खूप गरिबी अनुभवली आहे. वडिलांचं संगीतकार म्हणून करिअर अपयशी ठरल्यानंतर आईला जे अनुभव आले त्यामुळे तिचा पैशांबद्दलचा दृष्टिकोन असा झाला आहे, असं अमाल मलिकने नमूद केलं. अमालचा स्वभाव आईच्या अगदी उलट आहे.
एका रात्रीत २५ लाख कमावतो अमाल मलिक
पैशांची पर्वा नसल्याने करिअरमध्ये अनेक मोठे पेमेंट्स सोडून दिले, असं अमालने स्पष्ट सांगितलं. बरेच मोठे निर्माते पैसे देण्याचे वचन देतात, पण देत नाहीत, असं म्हणत त्याने म्युझिक इंडस्ट्रीची पोलखोल केली. “बरेच असे मोठे निर्माते आहेत जे पेमेंटच्या जवळजवळ ४०% पैसे देत नाहीत, पण ज्या लहान निर्मात्यांकडे बजेट नसतं ते मात्र असं करत नाहीत. माझी अशा लहान निर्मात्यांबरोबर काम करण्यास काहीच हरकत नाही. माझे एकूण जवळपास २५ लाख रुपये बाकी आहेत, पण मला त्याचा काहीच फरक पडत नाही कारण देवाची कृपा आहे. मी २५ लाख रुपये एका रात्रीत आणि एका परफॉर्मन्समध्ये कमवू शकतो” असं अमाल मलिक म्हणाला.
