संगीतकार व गायक अमाल मलिक हा त्याच्या गाण्यांबरोबरच त्याच्या वक्तव्यांमुळेदेखील चर्चेत असतो. हिंदी चित्रपट संगीतसृष्टीमध्ये अनेक दोष आहेत, ज्यामध्ये कामाचे स्वरूप, कलाकारांचे हक्क आणि मोबदला यांचा समावेश आहे.

अमाल मलिक नेमकं काय म्हणाला?

अमाल मलिकने नुकतीच पिंकविलाला मुलाखत दिली. या मुलाखतीत तो म्हणाला, “रॉय चित्रपटातील ‘सूरज डुबा हैं’ हे गाणे आठ ते नऊ लाखांच्या बजेटमध्ये बनले होते; परंतु या गाण्याने ६०-७० कोटी कमावले. मात्र, या यशाचे श्रेय त्याला दिले गेले नाही. या गाण्याने संगीतासाठी अंदाजे ६०–७० कोटी रुपये कमावले. मला त्याचा हिस्सा मिळाला नाही. फक्त प्रकाशन हक्क मिळाले आहेत. ते एक कोटी इतकेही नाहीत.”

तो पुढे म्हणाला, “मला इतके पैसे कमवायचे आहेत आणि त्या पैशांनी मला लोकांना मदत करायची आहे. मी ती मदत माझ्या पद्धतीने करतो, त्याबद्दल मला बोलायचं नाही; पण मला लोकांना मदत करण्यासाठी पैसे हवे आहेत. हे फक्त तेव्हाच शक्य आहे जेव्हा माझ्याकडे हक्क असतील किंवा समान हक्क असतील किंवा काही प्रकारचे हक्क असतील, जे चित्रपट संगीत क्षेत्रात मिळत नाहीत”, असे म्हणत काम करूनही संगीत क्षेत्रात हक्क मिळत नाहीत, असे अमाल मलिक म्हणाला.

“जर तू हे करत राहिलास, तर तुला कमी…”

अमाल पुढे म्हणाला की, दक्षिणेत ए. आर. रेहमानसारखे अनेक जण आहेत, जे त्यांच्या हक्कांसाठी लढतात. दक्षिणेतील संगीतकार १०-१५ कोटी घेतात. हिंदीमध्ये संगीतकारांना दोन ते तीन कोटी देतात. तसेच सगळे हक्क सोडायला लावले जातात. हे असं नाही, की आम्ही पैशांसाठी रडत आहोत. पण, पैसे ही अशी गोष्ट आहे की, जी माझ्यासारख्या लोकांना इतरांना मदत करण्यासाठी उपयोगी पडते.”

“आम्हाला पैसे हे स्वतःसाठी घर खरेदी करण्यासाठी किंवा इतर काही घेण्यासाठी नको आहेत. १६ वर्षे काम केल्यानंतर मी फक्त स्वतःसाठी एक कार घेतली. स्वतःसाठी कधीही काही केलेले नाही, नेहमी आजूबाजूच्या लोकांसाठी गोष्टी केल्या आहेत. “

अमाल असेही म्हणाला की, लोक आधी जसं ठरवून दिलेलं आहे, तसेच, त्याच मार्गानं काम करतात. गोष्टी वेगळ्या पद्धतीनं का करता येत नाहीत किंवा क्रेडिट्स इतर प्रकारे का दिलं जाऊ शकत नाही, याबद्दल कोणीही विचार करीत नाही. पाश्चिमात्य देशांत क्रेडिट देण्याची पद्धत खूप वेगळी आहे. आपल्याकडे स्पॉटिफायसारख्या प्लॅटफॉर्मवर अनेकदा त्या गाण्यात सहभागी सर्व लोकांची नावेदेखील दिसत नाहीत.

अमाल असेही म्हणाला की, अनेकदा कोर्टात याचिकादेखील दाखल झाल्या आहेत. अमालने असाही खुलासा केला की, गेल्या पाच वर्षांत मला ४०-४५ चित्रपटांतून काढले गेले आहे. लोक मला सांगतात की, जर तू हे करत राहिलास, तर तुला कमी काम मिळेल.

तसेच पारदर्शकता नसल्याबद्दलही तो म्हणाला, “मी माझ्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये माझे १०० टक्के देतो. लोक माझ्याकडून एखाद्या गाण्यासाठी १५-१६ पर्याय घेतात आणि इतर १० संगीतकारांकडूनही घेतात. सगळे जण मन लावून काम करत असतात; पण त्यानंतर रिजेक्ट केलं जातं. यामध्ये कोणतीही पारदर्शकता नसते.”

दरम्यान, अमाल मलिक हा नुकताच बिग बॉसच्या १९ व्या सीझनमध्ये दिसला होता.