आज आम्ही तुम्हाला अशा एका बॉलीवूड अभिनेत्रीबद्दल सांगत आहोत, जी खूपच बिनधास्त आहे. तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलं. इतकंच नाही तर तिच्या सुपरहिट चित्रपटांची यादीही मोठी आहे. आपल्या पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या या अभिनेत्रीने करिअरच्या सुरुवातीच्या काळात प्रचंड यश मिळवलं. मात्र, नंतरच्या काळात तिला काम मिळणं कमी झालं. दुसरीकडे, तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास आतापर्यंत अनेक अफेअर्सच्या चर्चा होऊनही ती वयाच्या ५१ व्या वर्षीही सिंगल आहे.

ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये धुमाकूळ घालणारी अमीषा पटेल आहे. अमीषा पटेल ५१ वर्षांची झाली आहे. अमीषाचा जन्म ९ जून १९७५ रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात झाला होता. ती प्रसिद्ध वकील आणि राजकारणी रजनी पटेल यांची नात आहे.

अमीषा पटेलचे शिक्षण

अमीषाने तिचे शालेय शिक्षण मुंबईतील प्रसिद्ध ‘कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूल’ मधून पूर्ण केले. ती अभ्यासात अत्यंत हुशार होती. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेली. तिने अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स येथील नामांकित ‘टफ्ट्स युनिव्हर्सिटी’ अर्थशास्त्र विषयात गोल्ड मेडल मिळवून पदवी पूर्ण केली. पदवीनंतर तिला लंडनमधील एका नामांकित फायनान्स कंपनीत ‘इकॉनॉमिक ॲनालिस्ट’ म्हणून नोकरीची ऑफरही मिळाली होती, पण तिने ती नाकारून भारतात परतत अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला.

अमीषा पटेलच्या पहिल्याच चित्रपटाने जिंकले होते तब्बल ९२ पुरस्कार

‘कहो ना प्यार है’ हा अमीषा पटेलचा पहिला चित्रपट. यात तिच्याबरोबर हृतिक रोशननेही पदार्पण केलं होतं. २६ वर्षांपूर्वी आलेला हा चित्रपट हृतिकचाही पहिलाच चित्रपट होता. ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाने या दोघांनाही रातोरात स्टार बनवले. हा चित्रपट त्या वर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होता. तर पुरस्कारांच्या बाबतीतही या चित्रपटाचा एकतर्फी दबदबा पाहायला मिळाला होता. वेगवेगळ्या श्रेणींमध्ये एकूण ९२ पुरस्कार आपल्या नावावर करत या चित्रपटाने इतिहास रचला होता. याच कारणामुळे या चित्रपटाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ आणि ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये करण्यात आली होती. या चित्रपटासाठी हृतिकला सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट पदार्पणचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता, तर अमीषा पटेलला ‘झी सिने अवॉर्ड्स’मध्ये सर्वोत्कृष्ट पदार्पण करणाऱ्या अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला होता.

५१ व्या वर्षीही अविवाहित आहे अमीषा पटेल

‘कहो ना प्यार है’ मधून ब्लॉकबस्टर पदार्पण केल्यानंतर अमीषाने ‘गदर’ सारखा आणखी एक ब्लॉकबस्टर चित्रपट दिला. मात्र, त्यानंतर तिचे लागोपाठ अनेक चित्रपट फ्लॉप झाले. २०२३ मध्ये आलेल्या ‘गदर २’ या ब्लॉकबस्टर चित्रपटामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली. अमीषा सध्या ५१ व्या वर्षीही सिंगल आयुष्य जगत आहे, तिने लग्न केलेलं नाही. पण आतापर्यंत तिचं नाव अनेकांशी जोडलं गेलं. त्यात दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्याबरोबरच्या तिच्या नात्याची खूप चर्चा झाली होती. त्याचबरोबर निर्वाण बिर्ला, कनव पुरी आणि कुणाल गूमर यांच्यासोबतच्या संबंधांमुळेही चर्चेत राहिली होती.