Ameesha Patel on Akshaye Khanna: अक्षय खन्ना व अमीषा पटेल यांनी ‘हमराज’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यांचा हा चित्रपट चांगलाच गाजला होता. २००२ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाबद्दल आजही बोलले जाते.
अमीषा पटेलने काही दिवसांपूर्वी रणवीर अलाहाबादियाच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने अक्षय खन्नाबद्दल वक्तव्य केले होते. तिने केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे. ती नेमकं काय म्हणाली आहे, हे जाणून घेऊ…
अक्षय खन्नाबद्दल अमीषा पटेलचे वक्तव्य
अमीषा पटेलला या मुलाखतीत विचारले की अक्षय खन्ना तेव्हा कसे होते आणि आता त्यांच्यात काय बदल झाला आहे? याचे उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, “तो तेव्हा जसा होता तसाच आजही आहे. तो सगळ्यांपासून दूर असतो. मी, बॉबी आणि अक्षयने चांगला वेळ एकत्र घालवला आहे. अक्षयला तुम्ही समजून घेतले पाहिजे. तो खूप साधा आहे.”
“जर त्याला तुम्ही आवडला तर तो तुमच्याशी खूप बोलतो. नाहीतर तो सर्वांपासून दूर असतो. आम्ही अक्षयबरोबर खायचो, प्यायचो, खोड्या काढायचो, खूप गप्पा मारायचो. बॉबी, अक्षय आणि माझी खूप चांगली टीम बनली होती. मी अक्षयबरोबर ‘आपकी खातिर’ हा एक चित्रपट केला होता. मी आजही त्याच्या संपर्कात असते. मी त्याच्या भावांबरोबरदेखील काम केले आहे. मी सगळ्या खन्ना आणि देओल कुटुंबाबरोबर काम केले आहे.”
“अक्षय ज्या प्रकारच्या भूमिका…”
या मुलाखतीत ती अक्षय खन्नाबद्दल असेही म्हणाली, “अक्षय ज्या प्रकारच्या भूमिका आता साकारत आहे. तशा भूमिकांमध्ये तो दिसेल, असा कोणीच विचार केला नव्हता. ‘दृश्यम’सारख्या चित्रपटात त्याने ज्या प्रकारची भूमिका साकारली आहे. तो तशा भूमिकेत दिसेल, अशी कोणी कल्पना केली नसेल.”
अक्षय खन्नाच्या एका भूमिकेबद्दल बोलताना अभिनेत्री पुढे म्हणाली, “अक्षय खन्नाला नकारात्मक भूमिका करणे जमणार नाही, तशा भूमिका त्याच्यासाठी नाहीत,असे लोकांना वाटले असेल. पण, त्याला त्या (दृश्यममधील) भूमिकेत पाहताना मला खूप भीती वाटली होती. म्हणजे त्याने जे काही केले, त्यात तो यशस्वी झाला. कारण- मला तो एक गोड मुलगा म्हणून माहित आहे.”
“मला कधीच वाटले नव्हते की तो इतक्या यशस्वीपणे खलनायकाची भूमिका साकारेल. त्यामुळे मला असे वाटते की इंडस्ट्री कलाकारांना टाइप कास्ट करते, की अमुक हे कलाकार अमुक पद्धतीच्या भूमिका साकारू शकतात, असे ते ठरवतात. पण, खरे तर तसे नसते. जेव्हा तुम्ही एखाद्या कलाकाराला आव्हान देता, त्यांना त्यांच्या कन्फर्ट झोनमधून बाहेर आणता, तेव्हा खरी मजा येते. ती हिंमत निर्माता आणि दिग्दर्शकामध्ये असायला हवी. बॉबी देओलच्या अॅनिमलमधील भूमिका पाहूनही अनेकांना आश्चर्य वाटले होते.”
दरम्यान, धुरंधर चित्रपटाला यश मिळाल्यानंतर अक्षयचे सर्वत्र कौतुक होत आहे, यातच अमीषा पटेलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
