मनोरंजनविश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी कधीच लग्न न करण्याचा निर्णय घेतलाय, तर काहींना इतक्यात लग्न करायचं नाहीये आणि काही लग्न न करता लिव्ह इनमध्ये राहणं पसंत करतात. अशातच आता बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलनेही लग्न न करण्याबद्दल सांगितलं आहे.
अमीषा पटेल तिच्या व्यावसायिक आयुष्यासह खासगी आयुष्यामुळेही चर्चते असते. अभिनेत्री अनेकदा तिच्या आयुष्यातील घडामोडींबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधत असते. अशातच आता नुकतंच तिने कधीच लग्न न करण्याबद्दल सांगितलं आहे. खरं तर कलाकार मंडळींना अनेकदा अनओळखी लोकांकडूनही लग्न कधी करणार आणि इतर खासगी गोष्टींबद्दल सहज विचारलं जातं. काही जण यावर मोकळेपणाने भाष्य करत उत्तरही देतात तर काही खासगी आयुष्यं गुपित ठेवणं पसंत करतात. पण अमीषाने मात्र थेट कधीच लग्न न करण्यामागचं कारण सांगितलं आहे.
…म्हणून अमीषा पटेलला करायचं नाहीये लग्न
अमीषा पटेलने लग्नाबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. नुकत्याच एक्स वरील #AskAmy मार्फत चाहत्यांशी संवाद साधताना तिने लग्न करण्याचा कोणताही विचार नसल्याचं सांगितलं. यादरम्यान एका चाहत्याने तिला, “तू लग्न कधी करणार?” असा प्रश्न विचारला. त्यावर अमीषाने थेट उत्तर दिलं. ती म्हणाली, “कधीच नाही. सिंगल राहून मी खूप आनंदी आहे. माझ्यावर प्रेम करणारे माझे १०० जवळचे कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणी आहेत. हे सगळं बदलण्यासाठी एका पुरुषाला माझ्या आयुष्यात येऊ देण्याची माझी अजिबात इच्छा नाही.” लग्न करण्याचा कोणताही विचार नसल्याचं अमीषा पटेल आता स्पष्टपणे सांगत असली, तरी याआधी तिने तिच्या प्रेमसंबंध आणि करिअर यांच्यापैकी एकाची निवड करताना घेतलेल्या कठीण निर्णयांबद्दल भाष्य केलं होतं.
Never ???superrr happy being single . I have 100 close family and friends who love me . Can’t afford one man to come and change all that ???? https://t.co/PIccHE7bSM
— ameesha patel (@ameesha_patel) August 6, 2026
रणवीर अलाहाबादियाला दिलेल्या मुलाखतीत अमीषा पटेलने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला होता. चित्रपटसृष्टीत येण्याचा निर्णय घेतल्यानंतर तिच्या जोडीदाराला ते मान्य नसल्यामुळे तिने त्या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. अमीषा म्हणाली, “जे लोक तुमच्यावर खरं प्रेम करतात, ते तुमच्या प्रगतीत कधीच अडथळा आणत नाहीत. मी करिअरसाठी खूप काही गमावलं आहे आणि प्रेमासाठीही खूप काही गमावलं आहे. दोन्ही गोष्टींसाठी मी एकमेकांचा त्याग केला आहे आणि त्या अनुभवांतून बरेच धडे शिकले.”
करिअरसाठी प्रेमाचा केलेला त्याग
ती पुढे म्हणाली, “चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी मी एका रिलेशनशिपमध्ये होते. तो मुंबईतील एका मोठ्या उद्योगपती कुटुंबातील मुलगा होता. आमची पार्श्वभूमी, शिक्षण आणि कौटुंबिक वातावरणही सारखंच होतं. सगळंच योग्य वाटत होतं. पण मी चित्रपटसृष्टीत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याला ते मान्य नव्हतं. त्यामुळे मला प्रेमापेक्षा करिअरची निवड करावी लागली.” याच मुलाखतीत अमीषाने लग्नाबाबतची भूमिकाही स्पष्ट केली होती. योग्य व्यक्ती भेटल्यास लग्न करण्यास आपण तयार असल्याचं तिने सांगितलं.
ती म्हणाली, “मला योग्य व्यक्ती भेटली तर लग्न करण्यास माझी काहीच हरकत नाही. जिथे इच्छा असते तिथे मार्ग असतो, असं म्हणतात. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीत मला स्वीकारणारी व्यक्ती भेटली तर तीच माझ्यासाठी योग्य असेल. आजही अनेक श्रीमंत कुटुंबांकडून मला लग्नाचे प्रस्ताव येतात. माझ्यापेक्षा निम्म्या वयाची मुलंही मला डेटवर घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त करतात. त्याबाबत माझा काही आक्षेप नाही, कारण पुरुष वयाने नव्हे तर विचारांनी परिपक्व असणं महत्त्वाचं आहे. माझ्यापेक्षा वयाने मोठे असूनही अनेकांची बौद्धिक परिपक्वता अत्यंत कमी असल्याचं मला जाणवलं आहे.”
