‘गदर’मधील सकीना या पात्रामुळे अमीषा पटेलला प्रचंड लोकप्रियता मिळाली. तिची ती क्रेझ आजही तिच्या चाहत्यामध्ये कायम आहे. परंतु, एखादं पात्र हिट ठरतं तेव्हा कलाकार फक्त कलाकार राहत नाहीत आणि प्रेक्षकांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग कसा बनतात याचा प्रत्यय अमीषाला तिच्या सकीना या पात्रामुळे आला होता. 

अमीषा पटेलने आत्तापर्यंत अनेक हिट चित्रपटात काम केलं आहे. एकेकाळी ती बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होती. इंडस्ट्रीतील अनेक लोकप्रिय अभिनेत्यांबरोबर तिने स्क्रीन शेअर केली आहे. तिच्या प्रत्येक चित्रपटाचा आणि त्यातील अभिनेत्यांबरोबरच्या केमिस्ट्रीचा वेगळा चाहतावर्ग आहे आणि त्याची क्रेझ त्यांच्यामध्ये आजही कायम आहे. यापैकीच एक चित्रपट म्हणजे ‘गदर’. ‘गदर’मध्ये सनी देओलबरोबर स्क्रीन शेअर केल्यानंतर ‘हमराज’ या चित्रपटात अमीषा पटेल त्याचा धाकटा भाऊ अभिनेता बॉबी देओललसह झळकली होती. परंतु, ‘गदर’मधील सनी देओल आणि तिची जोडी इतकी हिट ठरली होती की पुढच्या चित्रपटात दुसऱ्या कुठल्याही अभिनेत्याबरोबर तिला पाहण्यासाठी चाहते तयार नव्हते. एवढंच काय तर एकदा तिच्या चाहत्यांनी भर शूटिंग दरम्यान बॉबी देओल तिला मिठी मारत असताना अडवलंही होतं. हा किस्सा अभिनेत्रीने स्वतः सांगितला आहे.

अमीषा पटेलने सांगितला किस्सा

‘इंडियाज बेस्ट डान्सर्स सीझन ५’मध्ये गेस्ट म्हणून आली असताना अमीषा पटेलने ‘हमराज’ या चित्रपटातील एक रंजक किस्सा सांगितला आहे.  तिने सांगितलं की २००२ दरम्यान जयपुरमध्ये बॉबी देओलबरोबर क्लायमॅक्स सीन शूट करत असताना तिथे शूटिंग पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या तिच्या चाहत्यांनी तिला सकीना समजलं होतं. ज्यामुळे शूटिंग दरम्यान त्यांनी गोंधळ घातला होता.

बॉबी देओलला चाहत्यांनी का अडवलेलं?

अमीषा म्हणाली, “जयपुरमध्ये बॉबी देओलबरोबर शूटिंग करत असताना क्लायमॅक्स सीनमध्ये बॉबी मला मिठी मारत असतो. तेव्हा या सीनचं शूटिंग सुरू झालं  असताना ते लोक सोड तिला ती तुझ्या भावाची प्रेयसी आहे तारा सिंग तिला पाकिस्तानहुन घेऊन आला आहे. तिला हात लावू नको. असं म्हणत होते”. अमीषाने पुढे सांगितलं की, त्यावेळी तिने शूटिंग पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या लोकांना हा फक्त चित्रपटाचा एक भाग असल्याचं सांगितलं, त्यानंतर ते सगळे शांत झाले आणि शूटिंग पूर्ण केलं.

दरम्यान, अब्बास मस्तान दिग्दर्शित ‘हमराज’मध्ये बॉबी देओल, अमीषा पटेल, अक्षय खन्ना, सुहासिनी मुळ्ये हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांतून झळकले होते. त्यावेळी या चित्रपटातील गाणीसुद्धा प्रचंड हिट झाली होती.