भारतीय क्रिकेट संघामध्ये गेल्या दीड वर्षापासून बदलांचे वारे वाहत आहेत. आधी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित शर्माकडून अचानक कर्णधारपद काढून घेतलं. त्यानंतर रोहित आणि विराट कोहलीने अचानक टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून सर्वांनाच धक्का दिला. त्यानंतर सूर्यकुमार यादवला कर्णधार करण्यात आलं. त्याच्या नेतृत्त्वाखाली संघाने २०२६ चा टी-२० वर्ल्ड कप जिंकून दिला, पण दोनच महिन्यांत त्याला हटवून श्रेयस अय्यरला अचानक कर्णधार केलं. आता रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा होत आहेत. याचदरम्यान अभिनेत्री अमीषा पटेलने केलेल्या पोस्टने लक्ष वेधून घेतले आहे.
या सर्व घडामोडींनंतर बीसीसीआय आणि भारतीय निवड समितीवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. अमीषा पटेलनेही यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. तिने एक्सवर पोस्ट शेअर करत रोहित आणि विराटला योग्य वागणूक दिली जात नसल्याचं म्हटलंय. तसेच भारतीय क्रिकेटचा हा काळ अत्यंत क्रूर असल्याचंही अमीषा पटेलने लिहिलं.
अमीषा पटेलची पोस्ट
“बॉलीवूडशी संबंधित नसलेलं एक ट्विट.. बरेच दिवस झाले मी पाहतेय, त्यामुळे आज ट्विट करावंसं वाटलं. सध्याच्या क्रिकेटच्या युगात म्हणावं की या क्रूर क्रिकेट युगात विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या सीनियर सुपरस्टार्सना ज्या पद्धतीने वागणूक दिली जात आहे, ते पाहून मला धक्का बसला आहे.. हे अत्यंत लाजिरवाणं आहे,” असं अमीषा पटेलने तिच्या पोस्टमध्ये म्हटलंय.
रोहित शर्मा निवृत्त होणार असल्याच्या चर्चा
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, निवड समितीने रोहित शर्माचा २०२७ च्या वर्ल्ड कपमध्ये समावेश केलेला नाही. त्यामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सवर होणारा वनडे मालिकेतील तिसरा सामना हा त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरू शकतो. भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात रोहित शर्मा वनडेतून निवृत्ती घेणार असल्याचं म्हटलं जातंय. रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चेदरम्यान त्याचे आई–वडील तिसरा वनडे सामना पाहण्यासाठी लंडनमध्ये दाखल झाले आहेत. रोहितच्या निवृत्तीच्या चर्चांमुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. यानंतर रोहित शर्माला जबरदस्ती निवृत्ती घेण्यासाठी भाग पाडलं जातंय का? अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. अर्थात, याबाबत अद्याप बीसीसीआयचा कोणताही अधिकारी, प्रशिक्षक किंवा निवड समितीच्या सदस्याचे अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही. पण, हा रिपोर्ट समोर आल्यानंतर भारतीय क्रिकेट बोर्ड आणि निवड समितीवर टीका होत आहे.
