Actor’s Wife & Daughter Stranded In UAE : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू असून त्याचा परिणाम इतर मध्यपूर्व देशांवरही होत आहे. हल्ल्यांमुळे मध्यपूर्वेत तणाव वाढत आहे. त्यामुळे त्या भागात असलेल्या आपल्या कुटुंबीयांबद्दल अनेकजण काळजी व्यक्त करीत आहेत. सर्वसामान्य लोकांप्रमाणेच अनेक बॉलीवूड कलाकार आणि त्यांचे कुटुंबीयही अडकले आहेत.

ईशा गुप्ता, सोनल चौहान आणि नर्गिस फाखरी यांसारख्या काही कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करून सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. अशातच आता पंजाबी गायक आणि अभिनेता एमी विर्कने सोशल मीडियावर कुटुंबीयांच्या आठवणीत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. एमी विर्कची पत्नी आणि सहा वर्षांची मुलगी सध्या यूएईमध्ये असल्याचंही त्याने पोस्टमधून सांगितलं आहे.

यूएईमधील परिस्थितीमुळे माझं मन… : एमी विर्क

इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये एमी म्हणतो, “यूएईमधल्या परिस्थितीमुळे माझं मन खूप अस्वस्थ झालं आहे. माझी पत्नी आणि माझी सहा वर्षांची मुलगी तिथे आहेत. एक पती आणि वडील म्हणून अशावेळी भावनिक होणं स्वाभाविक आहे. ‘पप्पा, काही झालं तर मी बेडखाली लपेन. मी खूप धाडसी मुलगी आहे, काळजी करू नका’, असं माझ्या मुलीनं सांगितलं. पण एका वडिलांना आपल्या लहान मुलीकडून असे शब्द ऐकायला अजिबात आवडत नाहीत. आपण आपल्या रोजच्या आयुष्यात कितीही खंबीर असलो, तरी आपण सगळे कुटुंबासाठी जगणारी माणसं आहोत.”

या कठीण परिस्थितीतून जाणाऱ्या… : एमी विर्क

पुढे तो म्हणतो, “मला माहीत आहे की, माझ्यासारखी भीती आणि काळजी आता अनेक कुटुंबांना वाटत आहे. पण माझ्या प्रार्थना फक्त माझ्या कुटुंबासाठीच नाहीत, तर या कठीण परिस्थितीतून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहेत. यूएईमधील प्रशासन आणि सरकार जे प्रयत्न करत आहेत, त्यांची मी मनापासून दखल घेतो आणि त्यांचे आभार मानतो. मला समजतंय की, ते लोकांच्या सुरक्षिततेसाठी आणि मदतीसाठी काम करत आहेत. त्याबद्दल मी खरोखर कृतज्ञ आहे. चला, आपण सर्वजण तिथल्या शांततेसाठी, स्थैर्यासाठी आणि सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करूया. ही कठीण वेळ लवकर निघून जावो आणि प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित वाटू दे.”

एमी विर्कची पत्नी अन् ६ वर्षांच्या मुलीसाठी पोस्ट

Ammy Virk Instagram Story
एमी विर्क इन्स्टाग्राम स्टोरी
Ammy Virk Instagram Story
एमी विर्क इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, अजित कुमार, विष्णू मंचू, सोनल चौहान आणि ईशा गुप्ता यांसारखे काही भारतीय चित्रपट व टीव्ही कलाकारही सध्या यूएईमध्ये आहेत. तिथल्या कठीण परिस्थितीमुळे त्यांच्या चाहत्यांना काळजी वाटत आहे.