Bollywood Actress stranded in Dubai : इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली असून दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यामुळे तिथल्या विमानतळावर अनेक प्रवासी अडकले आणि या अडकलेल्या प्रवाशांत बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीही आहे.
‘जन्नत’ चित्रपटामुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री सोनल चौहान सध्या दुबईमध्ये अडकली आहे. मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे अनेक विमानांची उड्डाणे अचानक रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे ती भारतात परतू शकत नाहीय. यामुळे मायदेशी सुरक्षितपणे परतण्यासाठी तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे.
सोनलने तिच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) सह इन्स्टाग्राम स्टोरीवर मदतीसाठीची पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिनं दुबईमध्ये अडकल्याचं सांगत भारतात परतण्याचा कोणताही स्पष्ट मार्ग दिसत नसल्याचं म्हटलंय. तसंच मायदेशी सुरक्षितपणे परतण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत तिनं सरकारची मदत मागितली आहे. या मदतीसाठी ती सरकारची मनापासून आभारी राहील, असेही तिने नमूद केले आहे.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये सोनल म्हणते, “आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मी दुबईमध्ये अडकली आहे. सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीत सर्व विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहेत आणि भारतात परत येण्यासाठी कोणताही मार्ग उपलब्ध नाहीय. मला माझ्या मायदेशी सुरक्षितपणे परतण्यासाठी कृपया मदत करा. मी तुमची खूप आभारी राहीन.”
सोनल चौहानने शेअर केलेली एक्स पोस्ट
Hon’ble PM @narendramodi ji,
— SONAL CHAUHAN (@sonalchauhan7) February 28, 2026
I am currently stranded in Dubai due to the ongoing crisis, with flights cancelled and no clear way to return to India. I respectfully seek the Government’s guidance for a safe journey home
Grateful for any support extended????@MEAIndia @IndiainDubai
सध्या सोनल चौहानसह अनेक प्रवासी दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडकले आहेत. सोशल मीडियावर शेअर झालेल्या काही व्हिडिओंमध्ये विमानतळावरील गर्दी आणि चिंतेत असलेले प्रवासी दिसत आहेत.
इस्रायल आणि अमेरिकेने इराणमधील लष्करी ठिकाणांवर कारवाई केल्यानंतर पश्चिम आशियातील परिस्थिती अधिक गंभीर झालीय. त्यानंतर काही देशांनी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर मोठा परिणाम झाला आहे. देशातील अनेक विमान कंपन्यांना उड्डाणे रद्द करावी लागली किंवा मार्ग बदलावे लागले आहेत. अडकलेल्या प्रवाशांसाठी विमानतळांवर मदत कक्ष सुरू करण्यात आले आहेत.
सोनल चौहानने शेअर केलेली इन्स्टा स्टोरी

Air India आणि IndiGo या दोन्ही विमान कंपन्यांनी सांगितले की, त्या विमान वाहतूक प्राधिकरणांशी सतत संपर्कात आहेत आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सुरक्षित मार्ग उपलब्ध झाल्यानंतरच सेवा पुन्हा सुरू करण्यात येतील. तसंच प्रवाशांनी अधिकृत माहितीकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन कंपन्यांनी केले आहे.
