Soni Razdan SLAMS Firecrackers Ahead Of Diwali: अभिनेत्री दिया मिर्झाने मुंबई महापालिकेसाठी (BMC) एक व्हिडीओ बनवला होता. वाढत्या वायुप्रदूषणामुळे दिवाळीत फटाके फोडू नयेत, असे आवाहन तिने या व्हिडीओच्या माध्यमातून केले होते. या व्हिडीओमुळे वाद झाला. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने (BMC) अभिनेत्री दिया मिर्झाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरून हटवला. आता या सगळ्यात अभिनेत्री व आलिया भट्टची आई सोनी राजदान यांनी शेअर केलेली एक पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
“आजारपणामुळे मुलांचे शाळेचे किती दिवस वाया जातात”, सोनी राजदान म्हणाल्या…
सोनी राजदान यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करीत लिहिले, “लहान मुलांचे पालक तुम्हाला सांगू शकतील की, हवेच्या प्रदूषणामुळे त्यांच्या मुलांना किती त्रास सहन करावा लागतो. आजारपणामुळे मुलांचे शाळेचे किती दिवस वाया जातात.”
पुढे त्यांनी लिहिले, “अशा परिस्थितीत तुम्ही मला सांगत असाल की, अगदी एक फटाका फोडणंसुद्धा योग्य आहे. तर, माझ्या मते हे जीवनविरोधी (anti-life), आरोग्यविरोधी (anti-health) आणि देशविरोधी (anti national) आहे. आरोग्याची निवड आपण स्वतःसाठी आणि आपल्या मुलांसाठी करत असतो. आपण योग्य निवड करूया”, लिहीत वायुप्रदूषणामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले.) तसेच, फटाके फोडण्याबद्दल त्यांनी मत व्यक्त मांडले.
सोनी राजदान यांच्या पोस्टला अनेक कलाकारांनी लाईक केले आहे. त्यामध्ये झोया अख्तरसह इतर अनेक कलाकारांचा समावेश आहे. सोनी राजदान यांनी कमेंट सेक्शन बंद ठेवला आहे. दिया मिर्झाच्या पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करूया, असा संदेश असणाऱ्या व्हिडीओवर वाद होत असतानाच सोनी राजदान यांनी केलेल्या पोस्टचीही चर्चा होत असल्याचे दिसत आहे.
काय आहे प्रकरण?
दिवाळीत कोणत्याही वेळी आणि कुठेही फटाके वाजवून ध्वनी व वायुप्रदूषण करू नये, असे आवाहन करणाऱ्या अभिनेत्री व पर्यावरणीय कार्यकर्त्या दिया मिर्झाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला गेला होता. त्यानंतर वाद निर्माण झाला. भाजपा नेत्यांच्या आक्षेपानंतर आणि त्यांनी मिर्झा यांना हिंदूंविरोधी ठरवल्यानंतर, सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्याबाबत न्यायालयाच्या आदेशांविषयी जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या विनंतीवरून दियाने शेअर केलेला व्हिडीओ महापालिकेच्या सोशल मीडियावरून हटवण्यात आला.
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. तसेच, भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात सार्वजनिक हितासाठी पुढे येणाऱ्या सेलिब्रेटींच्या निवडीला राजकीय नेत्यांकडून जातीय रंग दिला जाणे आणि त्यावरून राजकारण करणे हे दुर्दैवी आणि धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाविरुद्ध असल्याचे खडेबोलही न्यायालयाने सुनावले. त्याच वेळी कोणत्याही व्यक्तीला सण साजरा करण्यापासून वेगळे ठेवता येणार नाही, असे स्पष्ट करून दिया यांचा हटवण्यात आलेली व्हिडीओ पुन्हा प्रसारित करण्याचे आदेशही न्यायालयाने महापालिका प्रशासनाला दिले.
