Amitabh Bachchan stays up until 4 am : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असतात. अनेक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे बिग बी आजही तेवढ्याच उत्साहाने काम करीत आहेत. ८३ व्या वर्षीही त्यांचा कामाप्रति आणि नवनवीन गोष्टी जाणून घेण्याविषयी असलेला उत्साह तरुणांना लाजवणारा आहे. अभिनय आणि इतर प्रकल्पांमध्ये व्यग्र असतानाही ते नियमितपणे ब्लॉग लिहून चाहत्यांशी संवाद साधतात. मात्र, अनेकदा हे ब्लॉग अमिताभ बच्चन पहाटे ४ वाजता शेअर करतात. पहाटे ४ वाजेपर्यंत अमिताभ बच्चन हे जागे राहत असल्याचे समोर आले आहे.
अनेक दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अमिताभ बच्चन हे ब्लॉग शेअर करीत चाहत्यांशी संवाद साधत असतात. त्यांनी आजपर्यंत 6,688 ब्लॉग्स लिहिले आहेत. मात्र त्यांची ब्लॉग शेअर करण्याची वेळ ही पहाटे ४ वाजता आहे. त्यावरून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. आजही अमिताभ यांनी त्यांच्या राहत्या घरी ‘जलसा’मधून पहाटे ४ वाजता ब्लॉग शेअर केला आहे.
अमिताभ बच्चन यांची पहाटे ४ वाजता पोस्ट
अमिताभ बच्चन यांनी लिहिले आहे की, अनेक वर्षांपासून मनात साचलेल्या गोष्टी आता समोर येत आहेत. मन मोकळं होत आहे. आयुष्यभर काही गोष्टींची इच्छा आणि स्वप्नं होती, ती आता भरभरून पूर्ण होत आहेत. आपल्याला जे वाटतं, ते बोलून दाखवणं आणि त्यामुळे मनं हलकं वाटणं. नव्या उमेदीनं पुढे जाणं, यात एक वेगळाच आनंद आहे. अशा अगदी छोट्या छोट्या गोष्टीही आता सहज शक्य होत आहेत. हे किती सुंदर अनुभव आहेत, अशा भावना अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केल्या आहेत.
…हा आनंद शब्दांत सांगू शकत नाही – अमिताभ
पुढे त्यांनी लिहिले आहे की, एखादी गोष्ट शोधायची किंवा मिळवायची असेल, तर ती आता काही क्षणांत उपलब्ध होते. आपल्याकडे जास्त असलेलं इतरांबरोबर वाटून घेण्यात एक वेगळं समाधान असतं. त्यातून मिळणारा आनंद शब्दांत सांगू शकत नाही. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, पूर्वी खूप गोष्टी आपल्याला माहीत नव्हत्या किंवा त्या शिकण्याची संधी मिळत नव्हती, त्या आता सहजपणे समजून घेता येतात. तंत्रज्ञानामुळे ज्ञानाच्या वाटा मोकळ्या झाल्या आहेत. कधी काळी जे अज्ञात होतं, ते आज आपल्याला एका क्लिकवर उपलब्ध आहे आणि हे सगळं अनुभवताना नवीन गोष्टी शिकण्याचा आनंदही तितकाच मोठा वाटतो, असे अमिताभ बच्चन यांनी लिहिले आहे.
हे फक्त माझ्याच बाबतीत घडतंय की इतरांच्याही? – बिग बी
पुढे बिग बी यांनी लिहिले आहे की, आपण एखादी सीरिज बघताना त्यामध्ये पूर्णपणे गुंतून जातो, ती कथा पुढे पाहण्यासाठी आपला वेळ खर्च करतो. त्या सीरिजमधील एखाद्या पात्राची निवड करतो आणि नकळतपणे आपण त्या पात्राला फॉलो करू लागतो. आपली वागण्याची आणि बोलण्याची पद्धत, आपली देहबोली ही त्या पात्रासारखी होऊ लागते. किती विचित्र आहे ना हे… हे फक्त माझ्याच बाबतीत घडतंय की इतरांच्याही? पण स्क्रीनवर जे घडतंय, त्यापेक्षा चित्रपटाच्या कथेने प्रेक्षकांच्या विचारांना आणि इच्छांना न्याय द्यावा, असे वाटते. शुभ रात्री… किंवा खरं तर सुप्रभात… कारण- ११ जून २०२६ रोजीची पहाटेची ४:३० ची वेळ होत आली आहे, असे अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे.
