Amitabh Bachchan Rekha relationship : अमिताभ बच्चन हे ८४ वा वाढदिवस साजरा करीत आहेत. बिग बी यांनी सिनेविश्वामध्ये त्यांच्या कामाने व अभिनयाने प्रचंड लोकप्रियता मिळवली असून ,त्यांचे वैयक्तिक आयुष्यही नेहमी चर्चेत राहिले आहे. अमिताभ बच्चन यांचे जया बच्चन यांच्याशी लग्न झालेले असतानाही त्यांचे नाव अभिनेत्री रेखा यांच्याबरोबर जोडले गेले होते. अमिताभ बच्चन यांनी रेखा यांच्याबरोबरच्या चर्चांवर स्पष्ट शब्दांत उत्तर दिले होते.
अमिताभ बच्चन व रेखा यांनी ‘दो अनजाने’, ‘मुकद्दर का सिकंदर’ व ‘सिलसिला’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. त्यावेळी अमिताभ यांचे जया बच्चन यांच्याशी लग्न झाले होते. १९९९ मध्ये भावना सोमय्या यांच्या ‘अमिताभ बच्चन : द लिजेंड’ या पुस्तकासाठी दिलेल्या मुलाखतीत रेखा यांच्याबरोबरच्या कथित अफेअरबद्दल त्यांनी भाष्य केले होते. या अफवांमुळे त्यांना ‘फ्लर्ट’ करणारा अभिनेता, असे म्हटले जाई. त्याबद्दल विचारले असता,ते म्हणाले, “याबाबत काही ठोस पुरावा असेल, तरच त्यावर उत्तर देईन; पण तोपर्यंत यावर काहीही न बोलणे, मला जास्त आवडेल. कारण- मी काहीही बोललो तरी ते आगीत तेल ओतल्यासारखे वाटेल.”
आम्ही दोघं एकत्र असल्याचं तरी तुम्ही किती वेळा पाहिलं आहे? – अमिताभ
पुढे अमिताभ म्हणाले, “त्या संबंधित स्त्रीबरोबर सार्वजनिक ठिकाणी माझे वागणे चुकीचे वाटले असेल, तर त्याबद्दल पुरावा द्यावा. ठोस पुरावा दिलात, तर त्याबाबत मी नक्की योग्य ते उत्तर देईन; पण फक्त सनसनाटी बातमी तयार करण्यासाठी माझ्यावर नाही ते आरोप करू नका आणि त्यावर मी प्रतिक्रिया द्यावी, अशी अपेक्षाही ठेवू नका. त्यांच्याबरोबर सार्वजनिक ठिकाणी चुकीचं काही वागणं तर दूरच; पण आम्ही दोघं एकत्र असल्याचं तरी तुम्ही किती वेळा पाहिलं आहे?”

रेखा या अमिताभ बच्चन यांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्यात राहायला गेल्याची अफवाही त्यावेळी पसरली होती. त्याबद्दल बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले, “एका नामांकित मॅगझिननं रेखा या ‘प्रतीक्षा’ बंगल्यात राहायला गेल्याचं वृत्त छापलं होतं. बंगल्याचे फोटो पाहून अनेक वाचकांनी या बातमीवर विश्वासही ठेवला असावा. मात्र, अशा बातम्यांमुळे लोकांची दिशाभूल होते आणि त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. या सगळ्या गोष्टींवर वारंवार स्पष्टीकरण देत बसणं मला अपमानास्पद वाटतं.”

अमिताभ बच्चन यांनी सिमी गरेवालला दिलेल्या एका मुलाखतीत रेखा यांच्याबरोबर कसे नाते आहे, यावर वक्तव्य केले होते. ते म्हणालेले, “ती माझी सहकलाकार होती आणि माझी सहकारी होती. साहजिकच जेव्हा आम्ही एकत्र काम करत होतो, तेव्हा आम्हाला एकमेकांना भेटावं लागे. पुरस्कार सोहळे आणि कार्यक्रमादरम्यानही आमची भेट होत असे; पण ते तेवढ्यापुरतंच मर्यादित होतं”, असे म्हणत अमिताभ बच्चन यांनी रेखा यांच्याबरोबर ते रिलेशनशिपमध्ये नव्हते, ते त्यांच्या प्रेमात नव्हते, असे स्पष्ट केले होते.
