Amitabh Bachchan On Retirement : बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी ८४ वा वाढदिवस साजरा केला असून, आजही ते मनोरंजन विश्वामध्ये सक्रिय आहेत. ‘कौन बनेगा करोडपती’मधून प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या बिग बी यांचा उत्साह पाहून चाहतेही थक्क होत असतात. जवळपास सहा दशके प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी नुकतेच एका मुलाखतीमध्ये त्यांच्या निवृत्तीच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली.
रेडिफ’साठी सुभाष के. झा यांना दिलेल्या मुलाखतीत अमिताभ बच्चन यांनी त्यांचे विचार मांडले. यावेळी सिनेविश्वातील अनुभव सांगताना त्यांनी वाढदिवसाबद्दल त्यांचे मत व्यक्त केले. अमिताभ बच्चन म्हणाले, “साजरा करण्यासारखं काय आहे? हा इतर दिवसांसारखाच एक दिवस आहे. मी यासाठी कृतज्ञ आहे की, मी अजूनही काम करतो आहे आणि माझे शरीर माझ्या उत्साहाला साथ देत आहे.”
बच्चन कुटुंबात वाढदिवसाच्या दिवशी आहे अनोखी परंपरा
त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी वडील हरिवंशराय बच्चन यांच्या एका कौटुंबिक परंपरेचीही आठवण सांगितली. कुटुंबातील व्यक्तीचा वाढदिवस असल्यास वडील कविता सादर करायचे. १९८२ मध्ये ‘कुली’च्या सेटवर झालेल्या जीवघेण्या अपघातानंतर या कविता म्हणण्याच्या परंपरेला एक नवीन अर्थ मिळाला.

अमिताभ बच्चन यांना पाहून वडिलांना अश्रू अनावर
१९८२ मध्ये ‘कुली’ चित्रपटाच्या शूटिंगवेळी अमिताभ बच्चन यांना गंभीर अपघात झाला होता. त्या प्रसंगाची आठवण सांगताना अमिताभ म्हणाले, “१९८४ मध्ये माझ्या जीवावर बेतलेल्या अपघातानंतर वडिलांनी माझ्या वाढदिवसानिमित्त कविता सादर केली होती, तेव्हा या कविता म्हणण्याच्या क्षणाला एक वेगळाच अर्थ प्राप्त झाला. ती माझ्यासाठी जणू नव्या आयुष्याची सुरुवात होती. कविता वाचताना वडिलांना अश्रू अनावर झाले होते. मी त्यांना अशा प्रकारे भावनिक होऊन रडताना पहिल्यांदाच पाहिले होते.”

अमिताभ बच्चन यांनी १९८४ मध्ये राजकारणात प्रवेश केल्यानंतर सिनेविश्वातून काही काळ विश्रांती घेतली होती; परंतु राजकारण सोडल्यानंतर त्यांनी पुन्हा कधीही निवृत्तीचा विचार केला नाही. अनेक दशके उलटूनही, त्यांनी निवृत्तीसंबंधीची कोणतीही घोषणा केलेली नाही. त्याबाबत बिग बी म्हणाले, “मी काम सोडण्याचा विचार का करावा? लोक मला माझ्या कामातून निवृत्त करण्यासाठी इतके उत्सुक का आहेत? मी मृत्यूच्या दारातून परत आलो आणि तिथून मला पुन्हा मागे खेचून आणण्यात आलं आहे. कोणीतरी, कुठेतरी माझं रक्षण केलं आहे.”
आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत मी कच्चा – अमिताभ बच्चन
चार हजार कोटी रुपयांची संपत्ती असलेले अमिताभ बच्चन अर्थिक व्यवहारांबाबत म्हणाले, “काय विकलं जातं आणि काय विकलं जात नाही, याची मला कल्पना नाही. अर्थकारण आणि आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत मी कच्चा आहे. स्वतःची जाहिरात कशी करायची, हे मला कधीच जमलं नाही. पण, माझ्या कारकिर्दीचा आलेख पाहिला, तर इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारणारे अभिनेते फार कमी दिसतील.”

१९७० आणि १९८० च्या दशकात त्यांनी यश चोप्रा, हृषिकेश मुखर्जी व मनमोहन देसाई यांसारख्या दिग्दर्शकांबरोबर काम केले. त्यानंतरच्या काळातही त्यांनी नव्या पिढीतील दिग्दर्शकांसह काम सुरू ठेवले आहे. आता ते ज्येष्ठ व्यक्तींच्या भूमिका साकारताना दिसून येतात. त्याबद्दल बिग बी म्हणाले, “आता मला ज्येष्ठ भूमिकांमध्ये प्रेक्षकांनी स्वीकारलं आहे. त्यामुळे मी त्यामध्ये पुढे जात आहे.”
