Amitabh Bachchan on Dhirubhai Ambani: अमिताभ बच्चन कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतात. त्यांचे अनेक सिनेमे गाजले आहेत. आजही ते विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. तसेच, सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ते प्रेक्षकांच्या भेटीला येतात. अमिताभ बच्चन यांचे विविध किस्सेही कायमच सांगितले जातात.

अमिताभ बच्चन बॉलीवूडमधील यशस्वी अभिनेते म्हणून ओळखले जात असले, तरीही त्यांच्या आयुष्यात असा एक काळ आला होता. ज्यावेळी त्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते

अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड( ABCL) या त्यांच्या कंपनीला ९० दशकाच्या मध्यात नुकसान सहन करावे लागले. स्थापना झाल्यानंतर काही दिवसांत ही कंपनी दिवाळखोरीत निघाली होती. अमिताभ बच्चन यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. त्यांच्यावर ९० कोटींचे कर्ज होते. मात्र, ते इतक्या आर्थिक संकटात असतानाही त्यांनी कोणाचीही मदत घेतली नाही. त्यांनी स्वत: मेहनत घेतली, कष्ट केले आणि हे कर्ज फेडले.

लोकप्रिय पटकथा लेखक व दिग्र्शक रूमी जाफरी यांनी एका मुलाखतीत अमिताभ बच्चन यांच्याबद्दल वक्तव्य केले. त्यांनी बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटात एकत्र काम केले होते.

रुमी जाफरी यांनी नुकतीच ‘जर्नी अनस्क्रिप्टेड विथ चंदा कोचर’ला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत ते म्हणालेले, “जेव्हा अमिताभ बच्चन यांच्या एबीसीएल कंपनीचे आर्थिक नुकसान झाले, त्यावेळी ते भरून काढण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी कोणाचीही मदत घेतली नाही, हे मी आत्मविश्वासाने सांगू शकतो. मला त्यांनी केलेले कठोर परिश्रम आठवतात. मी त्यावेळी पहिल्यांदाच कॉर्पोरेट प्रॉडक्शन कंपनी पाहिली. जेव्हा कंपनीची स्थापना झाली, त्यांनी त्या वेळचे कंपनीचे सीईओ संजीव गुप्ता यांनी त्यांची सर्व कमाई दिली. सचिन पिळगांवकर आणि जॉय ऑगस्टीन या दोघांबरोबर चित्रपट निर्मितीला सुरुवात केली. मी लेखक म्हणून कंपनीत रुजू झालो होतो.”

पुढे ते असेही म्हणाले, “ज्यावेळी कंपनी कर्जात बुडाली, त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी मेहनत केली आणि ते कर्ज फेडले. कौन बनेगा करोडपती आणि बॉलीवूडमध्ये काम करत त्यांनी कमाई केली.”

रुमी जाफरी असेही सांगितले, “जेव्हा धीरूभाई अंबानी यांना अमिताभ बच्चन यांच्या कर्जाबद्दल समजले तेव्हा त्यांनी मदतीचा हात पुढे केला होता. त्यांनी त्यांचा लहान मुलगा आणि माझा मित्र अनिल अंबानीला काही पैसे घेऊन पाठवले. ते अनिलला म्हणाले होते की, त्याचा हा वाईट काळ आहे, त्याला पैसे दे. मला हे अनिलने सांगितले होते. अमिताभ बच्चन यांनीदेखील रिलायन्सच्या स्थापनेला जेव्हा ४० वर्षे झाली, तेव्हा भावना व्यक्त केल्या होत्या. ते म्हणाले होते धीरूभाईंनी मला तितके पैसे देत मदतीचा हात पुढे केला होता, त्या पैशाने माझ्या सगळ्या समस्या संपल्या असत्या. त्यांच्या त्या दयाळू स्वभावाने मी भावुक झालो होतो.”

त्याबरोबरच धीरूभाई अंबानी अमिताभ बच्चन यांचे कौतुक करीत म्हणाले होते, “या मुलाने अपयश पाहिले; पण त्यानं स्वत:च्या कष्टानं त्यावर मात केली. मला त्याच्याबद्दल आदर वाटतो.” असे म्हणत धीरूभाई अंबानींनी मदतीचा हात पुढे केला होता. मात्र, अमिताभ बच्चन यांनी ते पैसे घेण्यास नकार दिला, असे सांगितले.