रणबीर कपूरने अनेकदा त्याचे वडील ऋषी कपूर यांच्या कडक शिस्तीबद्दल सांगितलं आहे. याउलट, रणबीरचा बालपणीचा मित्र अभिषेक बच्चनचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचं नातं नेहमीच प्रेमळ आणि मोकळं राहिलं आहे. नुकतंच रणबीर कपूर, साई पल्लवी आणि रवी दुबे यांनी अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती १८’च्या नव्या भागात हजेरी लावली. या भागात रणबीरने वडील ऋषी कपूर, आजोबा राज कपूर आणि पणजोबा पृथ्वीराज कपूर यांच्या आठवणींना उजाळा दिला. ऋषी कपूर यांचा रणबीरच्या चित्रपट निवडीबद्दल अनेकदा आक्षेप असायचा, याबद्दलही त्याने सांगितलं. तसेच अभिषेकच्या चित्रपट कारकिर्दीबाबत अमिताभ बच्चन यांचा दृष्टिकोन कसा होता, असा प्रश्न त्याने विचारला.

ऋषी कपूर यांना कधीच आवडले नाही रणबीरचे चित्रपट

अमिताभ बच्चन यांनी रणबीरला त्याचे दिवंगत वडील ऋषी कपूर चित्रपटांबाबत काय सल्ला द्यायचे, असं विचारलं. यावर रणबीर म्हणाला, “बाबा माझे चित्रपट पाहायचे, तेव्हा माझ्या चित्रपट निवडींवर आणि मी साकारलेल्या व्यक्तिरेखांमुळे ते कधीच आनंदी नसायचे. तमाशा, वेक अप सिड, बर्फी, रॉकेट सिंग यांसारखे माझे चित्रपट त्यांना समजण्यापलीकडचे होते.” पुढे तो म्हणाला, “माझे पणजोबा पृथ्वीराज कपूर यांनी एकदा एक वाक्य म्हटलं होतं, कलेचा उपयोग देशाच्या सेवेसाठी झाला पाहिजे. त्यामुळे बाबा मला विचारायचे की, तू कोणत्या देशाची सेवा करतोयस? हे चित्रपट नेमके कोणासाठी आहेत? फक्त मोठ्या शहरांतील प्रेक्षकांसाठी का? त्यावेळी बाबा नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, हे मला समजत नव्हतं. एक अभिनेता म्हणून मी माझ्या पद्धतीने विचार करत होतो. मला ज्या व्यक्तिरेखा समजत होत्या, त्याच मी साकारत होतो.”

अमिताभ बच्चन यांनी अभिषेकवर कधीच टीका केली नाही’

रणबीर कपूरने अमिताभ बच्चन यांना अभिषेकच्या कामाबद्दल त्यांच्याशी कशा प्रकारे संवाद साधायचे, असा प्रश्न विचारला. तो म्हणाला, “मी आणि अभिषेक लहानपणापासून एकत्र वाढलो आहोत. अभिषेकच्या एखाद्या कामाबद्दल तुम्हाला काही चांगलं किंवा वाईट वाटलं, तर तुम्ही त्याला थेट सांगायचात की जया जी यांच्या माध्यमातून बोलायचात? कारण माझे बाबा माझ्याशी आईच्या माध्यमातून बोलायचे. तुमची पद्धत काय होती?” यावर अमिताभ बच्चन म्हणाले, “टीका करण्यासाठी बाहेर आधीच लाखो लोक असतात. त्यामुळे घरातही आणखी एक टीकाकार असणं मला योग्य वाटत नव्हतं. मी कधीच त्याच्यावर टीका केली नाही, फक्त त्याला आशीर्वाद दिले. एखादा चित्रपट चालला नाही तरी हरकत नाही, तू आणखी चित्रपट करशील आणि तुला काम मिळत राहील, असं मी त्याला सांगायचो. मी त्याच्याशी बोलायचो, त्याला आशीर्वाद द्यायचो; पण कधीच त्याच्यावर टीका केली नाही. अभिषेकसारख्या कलाकारांना आपल्यावर टीका व्हावी, असं वाटतं. कारण टीकेतून आपण काय योग्य किंवा अयोग्य करतोय, हे समजतं आणि चुका सुधारण्याची संधी मिळते. पण मी त्याला कधीच तू हे किंवा ते चुकीचं केलंस, असं सांगितलं नाही.”

रणबीरने अभिषेकच्या स्वित्झर्लंडमधील कॉलेजच्या दिवसांची आठवण सांगितली. तो म्हणाला, “अभिषेक मला नेहमी सांगायचा की, तो स्वित्झर्लंडमध्ये शिकत असताना तुम्ही कामात खूप व्यग्र असायचात. मात्र, त्याच्या आयुष्यातील एखादा महत्त्वाचा प्रसंग असो, जसं की शाळेतील बास्केटबॉलचा सामना. तुम्ही फक्त सामना पाहण्यासाठी तिथे विमानाने जायचात आणि दोन तासांनंतर पुन्हा विमानाने परत येऊन थेट स्टुडिओत कामाला लागायचात. त्यावेळी तुम्ही मनापासून प्रयत्न केलेत, असं मला वाटतं. त्या काळात वडील आणि मुलाचं नातं काहीसं दुरावलेलं असायचं. पण अभिषेक मला नेहमी सांगायचा की, तुम्ही कितीही व्यग्र असलात तरी मुलांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगांसाठी नेहमी वेळ काढायचात” असं म्हणत रणबीरने आपलं बोलणं संपवलं.