Amitabh Bachchan Baghban Shooting : बॉलीवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी अनेक दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन केले असून आजही वयाच्या ८४ व्या वर्षी ते उत्साहाने काम करताना दिसून येतात. त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या कलाकारांनी अनेकदा बिग बी यांची कामाची पद्धत व वेळेवर सेटवर येण्याची सवय याचे कौतुक केले आहे. आता ‘महाभारत’ मालिकेतील युधिष्ठिरच्या भूमिकेमुळे घराघरांत पोहोचलेले अभिनेते गजेंद्र चौहान यांनी अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे.
‘हिंदी रश’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये गजेंद्र चौहान यांनी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर शूटिंगचा किस्सा सांगितला आहे. बागबान चित्रपटामध्ये त्यांनी एकत्र काम केले होते. यावेळी अमिताभ बच्चन यांना मारण्याचा सीन होता. त्यामुळे आधीच गोंधळलेल्या गजेंद्र चौहान यांना अमिताभ बच्चन यांनी जोरात मारण्याचा सल्ला दिला होता. तसेच सलमान खानचं मन खूप हळवं असल्याचं गजेंद्र चौहान यांनी सांगितलं आहे.
अमिताभ बच्चन यांना रिहर्सल करण्याबद्दल विचारलं – गजेंद्र चौहान
गजेंद्र चौहान म्हणाले, “मी अमिताभ बच्चन यांचा चाहता असल्यामुळे त्यांना मारण्याचा सीन करणं माझ्यासाठी खूप अवघड होतं. म्हणून मी त्यांना शूटिंगच्या आधी रिहर्सल करण्याची विनंती केली. मी त्यांना ‘सर,रिहर्सल करूया का’ म्हणून विचारलं, त्यांनी एका क्षणात होकार दिला. अमिताभ बच्चन यांना शूटिंगआधी सीनची तालीम करणं खूप आवडायचं,”
पूर्ण ताकदीने मला मारा – अमिताभ बच्चन
रिहर्सल करुनही प्रत्यक्ष सीनच्या शूटिंगवेळी मात्र गजेंद्र यांना खूप संकोच वाटला होता. ते म्हणाले, मी अमिताभ यांना सांगितले की, “सर, या सीनमध्ये मला असं काहीतरी करायचं आहे, ज्यासाठी माझं मन तयार होत नाही.” त्यावर अमिताभ यांनी काय करायचं आहे, असं विचारलं. मी त्यांना म्हणालो, मला तुम्हाला मारावं लागणार आहे, यावर अमिताभ यांनी उत्तर दिलं, “पूर्ण ताकदीने मला मारा.”
अमिताभ बच्चन यांनी स्वतः असं सांगितल्यामुळे गजेंद्र यांना खूप बरं वाटलं. ते म्हणाले, “हे एक वाक्य सांगतं की बच्चन साहेब म्हणजे बच्चन साहेब का आहेत. त्यांनी असा विचार केला नाही की हा नवोदित कलाकार आहे आणि मला जोरात कसा काय मारतोय. तो सीन चांगला आणि प्रभावी व्हावा म्हणून त्यांनी मला पूर्ण ताकदीने मारायला सांगितलं होतं.”
गजेंद्र चौहान यांनी सलमान खानबरोबरही काम केलेलं आहे. सलमानबरोबर शूटिंगचा अनुभव सांगताना ते म्हणाले, “तो खूप चांगला मित्र आणि अर्थातच उत्तम कलाकार आहे. पण त्याचं व्यक्तिमत्त्व नारळासारखं आहे. बाहेरून तो खूप कठीण दिसतो, पण त्याचं मन खूप हळवं आहे. कोणालाही मदत करण्यासाठी तो लगेच पुढे येतो. लोकांना मदत करण्याच्या बाबतीत त्याच्यापेक्षा चांगलं कोणी आहे, असं मला वाटत नाही. मी त्याच्याबरोबर दोन-तीन चित्रपट केले असून त्याचं वागणंही खूप चांगलं आहे,”
गजेंद्र चौहान यांनी ‘या’ सिनेमामध्ये केलेल्या भूमिका
गजेंद्र चौहान यांनी ‘अंदाज’, ‘बागबान’, ‘तुमको ना भूल पाएंगे’, ‘इंटरनॅशनल खिलाड़ी’, ‘होगी प्यार की जीत’, ‘बिल्ला नंबर ७८६’ आणि ‘आजा का रावण’ यांसारख्या सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी ‘बागबान’मध्येही काम केले होते. यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन व सलमान खानबरोबर स्क्रीन शेअर केली होती. गजेंद्र चौहान यांनी कार सेल्समनची भूमिका साकारली होती.
