बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी गेल्या काही वर्षांत रिअल इस्टेट क्षेत्रात, खासकरून जमिनींमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. अलिकडेच अयोध्येतील त्यांच्या गुंतवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय. गेल्यावर्षी त्यांनी कोट्यवधींचा भूखंड अयोध्येत घेतला होता. त्यानंतर आता पुन्हा काही एकर जमीन घेतली आहे.
अमिताभ बच्चन यांचा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याकडे कल दिसून येतो. अयोध्येत त्यांनी आधीच तीन मालमत्ता खरेदी केल्या आहेत आणि आता त्यांनी आणखी गुंतवणूक केली आहे. बच्चन यांनी तब्बल ३५ कोटी रुपयांमध्ये २.६७ एकर जमीन खरेदी केली आहे. ‘द सरयू’ या ७५ एकरच्या विस्तीर्ण प्रकल्पाची उभारणी करणाऱ्या समूहाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
एबी कॉर्प लिमिटेडचे मॅनेजिंक डायरेक्टर राजेश यादव यांनी हा व्यवहार पूर्ण केला. याबद्दल कंपनीकडून निवेदन देण्यात आले आहे. “बच्चन यांची ही गुंतवणूक जमिनीत गुंतवणूक करण्याचा विश्वास व पिढ्यानपिढ्या टिकणारी मालमत्ता याचे प्रतिबिंब आहे,” असं निवेदनात म्हटलंय.
अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत केलेली गुंतवणूक
दरम्यान, द सरयू हा प्रकल्प राम मंदिरापासून अवघ्या काही अंतरावर आहे. भविष्यात अयोध्येचे धार्मिक आणि पर्यटन महत्त्व वाढणार असल्याने ही एक धोरणात्मक गुंतवणूक मानली जात आहे. अमिताभ बच्चन यांनी गेल्यावर्षी एकूण ४ भूखंड अयोध्येत खरेदी केले. राम मंदिर उद्घाटनापूर्वी त्यांनी अयोध्येत ५,३७२ चौरस फूट भूखंड खरेदी केला होता, ज्यासाठी त्यांनी ४.५४ कोटी रुपये मोजले होते. तसेच गेल्यावर्षी सरयू रिअल इस्टेटमध्ये त्यांनी १४.५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. त्याचबरोबर त्यांनी शहरात ५४,००० चौरस फूटचा भूखंड देखील खरेदी केला, जो त्यांचे वडील हरिवंश राय बच्चन यांच्या ट्रस्ट अंतर्गत नोंदणीकृत आहे. या जमिनीवर वडिलांचे स्मारक बांधण्याची बिग बी यांची योजना असल्याचं म्हटलं जात आहे.
कामाबद्दल बोलायचं झाल्यास ‘कोन बनेगा करोडपती’मध्ये व्यग्र असलेल्या बच्चन यांनी आता ‘कल्की २८९८ एडी’च्या (Kalki 2898 AD) पुढच्या भागाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. बिग बींनी ही बातमी त्यांच्या ब्लॉगवर शेअर केली आहे. त्यांनी त्यांच्या घराबाहेरचे काही फोटो पोस्ट केले आहेत, ज्यात त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी दिसत आहे. पण या रविवारी चाहत्यांना भेटू शकणार नसल्याचं आधीच सांगितलं होतं. “मी त्यांना सांगितलं होतं की या रविवारी मी येऊ शकणार नाही, कारण मी हैदराबादमध्ये शूटिंग करत होतो,” असं बिग बी फोटो पोस्ट करत म्हणाले होते.
