KBC 18 contestant On Amitabh Bachchan and Abhishek Bachchan: जर आई-वडील आणि मुलं एकाच क्षेत्रात काम करत असतील, तर त्यांची कायम तुलना होत असते. अभिनय क्षेत्रात याची अनेक उदाहरणे आहेत. जर पालकांची मोठी लोकप्रियता असेल, त्यांचा मोठा चाहतावर्ग असेल, तर त्यांच्या मुलांना त्यांची वेगळी ओळख निर्माण करताना समस्या येतात. बऱ्याचदा त्यांच्या पालकांबरोबर त्यांची तुलना होते. अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन अशीच एक जोडी आहे.

अमिताभ बच्चन यांना बॉलीवूडचे महानायक म्हणून ओळखले जाते. बॉलीवूडला एका वेगळ्या उंचीवर नेण्यात त्यांचे योगदान आहे. ८३ व्या वर्षीही ते विविध भूमिका, कलाकृतींमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. जेव्हा त्यांच्या मुलाने अभिषेकने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले, त्यावेळी त्याला तितकी लोकप्रियता मिळू शकली नाही. त्याची त्याच्या वडिलांशी म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना झाली. अलीकडील काळात विविध धाटणीच्या भूमिका साकारत अभिषेकने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. त्याचे विविध स्तरांवर कौतुक होताना दिसत आहे.

“जर अभिषेक अभिनेता नसता, तर तो उत्तम उद्योजक झाला असता”

आता मात्र अमिताभ बच्चन होस्ट करीत असलेल्या कौन बनेगा करोडपतीच्या १८ व्या सीझनमध्ये एका स्पर्धकाचे वक्तव्य सध्या लक्ष वेधून घेत आहे. अभिषेकने जे करून दाखवले, ते अमिताभ बच्चन करू शकणार नाहीत, असे एका स्पर्धकाने म्हटले आहे.

कौन बनेगा करोडपतीच्या १८ व्या सीझनमध्ये बबलू कुमार पंडित हे पहिले स्पर्धक म्हणून सहभागी झाले. ५० लाखांसाठी विचारलेल्या प्रश्नावर ते आऊट झाले. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्याप्रति आदर व्यक्त केला. पण, याबरोबरच त्यांनी अभिषेकचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले. ते म्हणाले की, जर अभिषेक अभिनेता नसता, तर तो उत्तम उद्योजक झाला असता. तसेच, द बिग बुल आणि आय वॉन्ट टू टॉक या सिनेमात अभिषेकने उत्तम अभिनय केला आहे.

पुढे विनोदाने ते म्हणाले, “या सिनेमांत जे अभिषेकने केले आहे, ते कदाचित अमिताभ बच्चनसुद्धा करू शकत नाहीत.” त्यांच्या या वक्तव्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. बबलू कुमार यांचे हे वक्तव्य ऐकल्यानंतर अमिताभ बच्चन सुरुवातीला आश्चर्यचकित झाले आणि त्याचबरोबर त्यांना आनंदही झाला.

अभिषेक बच्चनच्या आय वॉन्ट टू टॉक या सिनेमासाठी त्याला २०२४ मध्ये फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळाला आहे.