Amitabh Bachchan movies : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘शहेनशाह’ म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांनी आपल्या अभिनयाने अनेक दशके प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांच्या असंख्य चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. एक काळ असा होता की, अमिताभ बच्चन यांचा चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण होत असे. चित्रपटगृहाबाहेर गर्दी, हाऊसफुलचे बोर्ड आणि सर्वत्र त्यांच्याच सिनेमाची चर्चा रंगायची. नंतर मात्र परिस्थिती बदलत गेली आणि अमिताभ यांची जादू कमी होत गेली.

यश, लोकप्रियता आणि स्टारडमच्या शिखरावर पोहोचल्यानंतर प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात चढ-उतार येतात. त्याप्रमाणे अमिताभ बच्चन यांनाही कारकिर्दीत अपयशाचा सामना करावा लागला होता. अनेकांनी त्यांची कारकीर्द संपल्याची चर्चा सुरू केली होती. पण पुढे बिग बी यांनी असा एक चित्रपट केला, ज्यामधून त्यांनी सिनेविश्वामध्ये जोरदार कमबॅक केले आणि अभिनयाच्या दुसऱ्या इनिंगला दमदार सुरुवात केली.

रवी चोप्रा यांनी दिली चित्रपटाची ऑफर

९० च्या दशकाच्या शेवटी अमिताभ बच्चन यांच्या करिअरमध्ये संघर्ष सुरू होता. त्यांचे चित्रपट काही खास कमाई करत नव्हते. अनेक चित्रपटांना प्रेक्षकांचा अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद न मिळाल्याने निर्मात्यांचे नुकसान होत होते. करिअरच्या या फेजमध्ये अडकलेल्या अमिताभ बच्चन यांना दिग्दर्शक रवी चोप्रा यांनी एका चित्रपटाची ऑफर दिली. कौटुंबिक वाद आणि नात्यांवर आधारित हा चित्रपट होता. अमिताभ बच्चन यांनीही चित्रपटाला होकार दिला. कौटुंबिक चित्रपटाची कथा दमदार; पण तो चित्रपट अमिताभ बच्चन यांच्या करिअरला कलाटणी देईल, असा कोणी विचाररही केला नसेल. तो चित्रपट म्हणजे बागबान.

‘या’ चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः रडवले

‘बागबान’ चित्रपट २००३ साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बघताना नकळत प्रेक्षकांचे डोळे पाणावत होते. प्रत्येकाच्या मनाला भिडणारा हा चित्रपट आजही मनाला स्पर्श करतो. त्यामध्ये सेवानिवृत्त झालेल्या वडिलांची कथा दाखवण्यात आली आहे. आयुष्यभर कष्ट करून सांभाळ केलेल्या मुलांनी आई-वडिलांच्या म्हातारपणामध्ये केलेल्या हालअपेष्टा या चित्रपटामध्ये दाखवण्यात आल्या आहेत. प्रेक्षकांना भावूक करीत त्यांना रडवणाऱ्या या चित्रपटात समाजातील परिस्थिती मांडण्यात आली होती. चित्रपट पाहताना अनेक प्रेक्षकांना त्यातील प्रसंगांनी कधी त्यांच्या हृदयाला स्पर्श केलाय हे कळत नव्हते आणि त्यामुळे हा चित्रपट प्रत्येक प्रेक्षकाला सहजपणे भावनाविवश करीत होता.

‘बागबान’ला मिळाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद

आज ‘बागबान’ हा चित्रपट एक क्लासिक सिनेमा म्हणून ओळखला जात आहे. परंतु, हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा पहिले चार दिवस त्यासाठी खूपच अवघड गेले होते. चित्रपटाची कमाई अपेक्षेप्रमाणे होत नव्हती. इतकेच नव्हे, तर निर्मात्यांनाही हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल की नाही, अशी शंका वाटू लागली होती. मात्र, जसजसा लोकांनी चित्रपट पाहण्यास सुरुवात केली, तसतशी चित्रपटाची चर्चा वाऱ्यासारखी सर्वदूर होऊ लागली. मग चित्रपटाच्या कथेचे आणि कलाकारांचे कौतुक होऊ लागले. त्यामुळे ‘बागबान’ला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळू लागला.

सलमान खानची जबरदस्त एन्ट्री

चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर सलमान खानची चित्रपटामध्ये एन्ट्री झाली होती. चित्रपटात सलमान खानला कॅमिओ भूमिकेत घेतल्यास त्याचा फायदा होऊ शकतो, असा सल्ला निर्मात्यांना देण्यात आला. त्यानंतर दिग्दर्शक रवी चोप्रा यांनी सलमान खानची भेट घेतली आणि सलमान खाननेसुद्धा तत्काळ या भूमिकेसाठी होकार दिला. चित्रपटातील त्याची उपस्थिती प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आणि त्याच्या भूमिकेचेही मोठे कौतुक झाले. बागबान हा चित्रपट अमिताभ बच्चन यांच्यासाठी मैलाचा दगड ठरला आणि त्यांचे करिअर नव्या जोमाने सुरू झाले.