महानायक अमिताभ बच्चन हे वयातही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत. ते एक्स, फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दररोज न चुकता आपले विचार, कविता आणि जुन्या आठवणी शेअर करत असतात. विशेष म्हणजे, ते त्यांच्या प्रत्येक पोस्टला एक विशिष्ट क्रमांक देतात. हे नंबर त्यांची एक युनिक स्टाईल बनली आहे. त्याचबरोबर, ते अनेक वर्षांपासून ब्लॉगदेखील लिहितात. अमिताभ बच्चन दररोज मध्यरात्री किंवा पहाटे पोस्ट करतात आणि चाहत्यांशी संवाद साधतात. चित्रपटाचे अपडेट्स असो, सामाजिक विषयांवरील मतं असो, किंवा रात्री-अपरात्री केलेले एखादे गूढ ट्विट, अमिताभ बच्चन यांच्या पोस्ट कायमच लक्ष वेधून घेतात. त्यांची अशीच एक पोस्ट सध्या चर्चेत आहे.

अमिताभ बच्चन यांनी फिफा वर्ल्ड कपमध्ये फ्रान्सच्या फुटबॉल संघाला विजयाच्या शुभेच्छा देताना एक टिप्पणी केली होती. त्या टिप्पणीवरून ते चांगलेच ट्रोल झाले होते. त्यानंतर आता त्यांनी ७ जुलै रोजी पहाटे ४ वाजून ९ मिनिटांनी एक अशी पोस्ट केली आहे, ज्यामुळे चाहते चक्रावले आहेत. ‘पहाटे पहाटे बिग बींना नक्की काय झालंय, जे ते अचानक महानतेवर लिहत आहेत आणि ते महानता फिकी पडण्याची काळजी का करत आहेत?’ असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

अमिताभ बच्चन यांची पहाटे ४ वाजताची पोस्ट

८३ वर्षांच्या अमिताभ बच्चन यांनी मंगळवारी (७ जुलै) पहाटे ४:०९ वाजता एक्सवर लिहिलं, “काळाबरोबर महानता कमी होत जाते.” याच्या काही वेळानंतर त्यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर “काय समजलात?” असे आणखी दोन शब्द लिहिलं.

अमिताभ बच्चन यांच्या या पोस्ट्स पाहिल्यानंतर नेटकरी आता तर्क लावत आहेत. काहींनी या पोस्टचा संबंध त्यांच्या त्या वादग्रस्त वर्णद्वेषी टिप्पणीवरून झालेल्या टीकेशी जोडला आहे. लोकांच्या मते, सोशल मीडियावर ज्या प्रकारे त्यांना ट्रोल केलंय, त्याचं त्यांना वाईट वाटलं असावं. यावर एका युजरने “जे झालं, ते विसरून जा” असं लिहिलं. तर दुसरा म्हणाला, “सर, शेवटी फक्त आठवणी उरतात, बाकी काही नाही.” तर आणखी एका चाहत्याने “तुमची महानता नेहमीच कायम राहील, तुमच्यासारखा माणूस पुन्हा कधीच होणार नाही,” अशी कमेंट केली.

फ्रान्सच्या फुटबॉल संघावरील टिप्पणीमुळे वादात अडकले अमिताभ बच्चन

६ जुलै रोजी फ्रान्सच्या फिफा वर्ल्ड कप २०२६ मधील विजयावर अमिताभ यांनी एक पोस्ट केली होती. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, “T 5794 – आता सांगूनच टाकतो- फ्रान्सची वर्ल्ड कप २०२६ फुटबॉल टीम.. फ्रान्सची टीम. टीममध्ये ११ खेळाडू. १० काळे आणि एक गोरा. ब्लॅक पॉवर.” त्यांच्या याच ट्विटवरून सोशल मीडियावर मोठा गदारोळ झाला आणि युझर्सनी अमिताभ बच्चन यांना ट्रोल केलं. या वादग्रस्त पोस्टनंतर काही तासांतच, ७ जुलै रोजी पहाटे ४ वाजता अमिताभ यांनी ‘महानते’वर ही नवी पोस्ट केली, ज्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे.