अमिताभ बच्चन नेहमीच त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चनचं कौतुक करत असतात. अनेकदा ते अभिषेकच्या नवीन कलाकृतींबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती देत असतात. पण अनेकांना माहीत नसेल की अभिषेक बच्चन अमिताभ बच्चन यांना इतका प्रिय आहे की त्याच्या जन्मानंतर त्यानी एक निर्णय घेतला होता ज्यामुळे त्यांना दुखापत होण्याचीही शक्यता होती.

१९७०च्या दशकात हिंदी सिनेमातील दिग्गज कलाकार खऱ्या आणि अप्रशिक्षित वाघांबरोबर स्टंट करायचे. अनेकदा या स्टंटदरम्यान त्यांनी आपला जीव धोक्यात घातला होता. या कलाकारांमध्ये अमिताभ बच्चन आणि दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांचाही समावेश आहे. हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत ज्येष्ठ ॲक्शन मास्टर मोहन बग्गड यांनी आता याबद्दलच सांगितलं आहे. अमिताभ बच्चन यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, “खून पसीना चित्रपटात मिताभ बच्चन यांच्यासाठी मी एक स्टंट केला होता, ज्यात वाघ होता. अमितजींसाठी स्टंट करणाऱ्या मूळ व्यक्तीचा रंग सावळा होता. त्यामुळे निर्मात्यांना ते योग्य वाटणार नाही, असं वाटलं. दिग्दर्शकाने ॲक्शन दिग्दर्शक वीरू देवगण यांना त्यांच्या टीममधील कोणी हा स्टंट करू शकतो का, असं विचारलं. त्यानंतर मग मला हा स्टंट करशील का, असं विचारण्यात आलं. मी हो म्हटलं, मात्र वाघाबरोबर स्टंट असल्याने मला भीती वाटत होती.”

मोहन यांनी पुढे सांगितलं, “मला वाघासमोर उभं राहू नकोस, असं सांगण्यात आलं होतं. त्याने पंजा मारला असता तर माझा चेहराही खराब झाला असता काही शॉट्स दिल्यानंतर मला त्याची सवय झाली. त्यामुळे पुढचे दोन-तीन दिवस मी हा सीन शूट केला. अमितजींनी मला पाहिलं आणि त्यांनाही आत्मविश्वास आला. त्यांनीही मीसुद्धा हा सीन करेन असं म्हटलं.”

अभिषेकच्या जन्मानंतर अमिताभ यांनी घेतलेला निर्णय

मोहन यांनी पुढे सांगितलं की, अमिताभ बच्चन यांना त्याच दिवशी ते वडील झाल्याची बातमी मिळाल्याने त्यांना हा सीन करण्याचं आणखी धैर्य मिळालं होतं. ५ फेब्रुवारी १९७६ रोजी कांदिवलीमध्ये शूटिंग सुरू असताना त्यांना फोन आला आणि सांगण्यात आलं, “तुम्हाला मुलगा झाला आहे.” त्यावर अमिताभ बच्चन म्हणाले, “हा वाघ आहे तर मीही वाघ आहे. माझ्या घरी एक वाघ जन्माला आला आहे.” त्यानंतर त्यांनीही वाघाबरोबर काही दमदार शॉट्स दिले.

मोहन बग्गड यांनी सांगितलं की ‘खून पसीना’मध्ये त्यांनी वाघाबरोबर स्टंट केला होता. मात्र शूटिंगदरम्यान एका क्षणी वाघाने त्यांना इतक्या जोरात खाली पाडलं की त्यांचं डोकं जमिनीवर आपटलं आणि ते बेशुद्ध झाले. याशिवाय अमिताभ बच्चन यांच्यासाठी राकेश कुमार यांच्या १९७९ मध्ये आलेल्या ‘मिस्टर नटवरलाल’ या ॲक्शन-कॉमेडी चित्रपटात वाघाबरोबर ॲक्शन सीन करतानाही त्यांना दुखापत झाली होती.

मोहन म्हणाले, “वाघाने मला पंजा मारला होता, त्यामुळे आजही माझ्या चेहऱ्यावर त्या जखमांच्या खुणा आहेत. माझ्या आणखी एका मित्राला तर १०-१२ टाके पडले होते. ते वाघ प्रशिक्षित नव्हते. त्यामुळे त्यांना राग यायचा आणि ते सगळ्यांवर हल्ला करायचे.”