बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी गेल्या पाच दशकांहून अधिक काळात अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम केलं. त्यापैकी एक म्हणजे दिवंगत अभिनेते मुकरी. या दोघांच्या ऑनस्क्रीन जोडीला, मैत्रिला नेहमीच चांगला प्रतिसाद मिळाला. ‘लावारिस’, ‘शराबी’, ‘कुली’ अशा अनेक चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र काम केलं.

मात्र, २००० साली मुकरी यांचं निधन झाल्यानंतर अमिताभ बच्चन आणि जया बच्चन त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिले नव्हते, असा दावा आता मुकरी यांची लेक नसीम मुकरीने केला आहे. विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीत नसीम मुकरीने सांगितलं की, “मुकरी यांच्या निधनाची बातमी कळताच ऋषी कपूर सकाळी ७ वाजताच आमच्या घरी आले होते. ते लहान मुलासारखे रडत होते. मात्र, अमिताभ बच्चन कधीच आले नाहीत.”

अंत्यसंस्कारालाही गेले नव्हते अमिताभ बच्चन

नसीमने पुढे सांगितलं की, मुकरी यांच्या निधनानंतर अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कुटुंबाशी संपर्कही ठेवला नाही. ते त्यांच्या घरी कधीही गेले नाहीत. मात्र, अमिताभ यांच्या संघर्षाच्या काळात ते मेहमूद यांच्या घरी राहत असताना अधूनमधून त्यांच्या घरी जायचे. नंतर मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली, असा दावाही तिने केला. नसीम मुकरीने पुढे चित्रपटसृष्टीतील नातेसंबंधांवरही भाष्य केलं. ती म्हणाली, “चित्रपटसृष्टीतील मैत्री अशीच असते. जोपर्यंत तुमची जोडी हिट असते आणि चित्रपटाला यश मिळवून देण्यात तुमचा वाटा असतो, तोपर्यंत सगळे खूप जवळचे असतात. पण ते थांबलं की सगळं संपतं. मग तुम्ही कोण? अशीच वागणूक मिळते.”

अमिताभ बच्चन आणि मुकरी यांची अभिनेता-विनोदी कलाकार अशी जोडी त्या काळात प्रचंड लोकप्रिय होती. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र काम केलं आणि प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. नसीम मुकरीला पुढे मुकरी यांच्या अंत्यसंस्काराला अमिताभ बच्चन आले नव्हते, पण जया बच्चन आल्या होत्या का? असं विचारण्यात आल्यानंतर यावर तिने स्पष्टपणे “नाही” असं उत्तर दिलं. ती म्हणाली, “माझ्या वडिलांची आणि जया बच्चन यांची पिया का घर चित्रपटापासून खूप चांगली मैत्री होती. त्या काळात गावांमध्ये होणाऱ्या आउटडोअर शूटिंगदरम्यान सगळे एकत्र राहायचे. पण वडिलांच्या निधनानंतर त्या देखील आल्या नाहीत. साधा फोनही केला नाही. खरं सांगायचं तर त्या वेळी कोण आलं आणि कोण नाही, याकडे आमचं लक्षच नव्हतं.”

‘ऋषी कपूर लहान मुलासारखे रडत होते’ – नमीस मुकरी

मात्र, दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी मुकरी यांच्या निधनाची बातमी रात्री २ वाजता दूरदर्शनवरील वृत्तातून पाहिली. त्यानंतर सकाळी ७ वाजताच ते मुकरी यांच्या घरी पोहोचले. नसीम म्हणाली, “सकाळी सात वाजता घराची बेल वाजली. आम्ही दरवाजा उघडला तर समोर ऋषी कपूर उभे होते. ते अगदी लहान मुलासारखे रडत होते. कारण माझ्या वडिलांनी त्यांच्याबरोबर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं.” ऋषी कपूर आणि मुकरी यांनी ‘अमर अकबर अँथनी’सह अनेक चित्रपटांत एकत्र काम केलं होतं. या चित्रपटात मुकरी यांनी नीतू कपूर यांच्या वडिलांची भूमिका साकारली होती. नसीमने सांगितलं की, ‘तय्यब अली’ हे गाणं इतकं गाजलं, त्यामागे ऋषी कपूर आणि मुकरी यांच्या अभिनयाचाही मोठा वाटा होता.” दिवंगत अभिनेते मुकरी यांचं २००० साली मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. निधनाच्या वेळी त्यांचं वय ७८ वर्षे होतं.

हिंदी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट विनोदी कलाकार म्हणून मुकरी यांची ओळख होती. ‘मदर इंडिया’, ‘बॉम्बे टू गोवा’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘कुली’, ‘शराबी’, ‘लावारिस’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांतील त्यांच्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आणि त्यांना बॉलिवूडमधील लोकप्रिय विनोदी अभिनेत्यांपैकी एक स्थान मिळवून दिलं.