Amitabh Bachchan emotional post: अमिताभ बच्चन हे त्यांच्या विविध प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. ते सोशल मीडियावरही सक्रिय आहेत. ते त्यांच्या आयुष्यातील विविध गोष्टी ब्लॉगच्या माध्यमातून शेअर करत असतात. आता लवकरच ते कौन बनेगा करोडपतीच्या नवीन सीझनमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

अमिताभ बच्चन गेल्या अनेक वर्षांपासून कौन बनेगा करोडपतीचे सूत्रसंचालन करत आहेत. या शोमध्ये ते स्पर्धकांशी मनमोकळेपणाने संवाद साधतात. त्यांच्या गोष्टी ऐकून घेतात. तसेच, त्यांचे अनुभव, किस्से सिनेमाच्या शूटिंगदरम्यान घडलेले प्रसंग, आठवणी अशा अनेक गोष्टी ते सांगतात. अमिताभ बच्चन यांचा अंदाज कायमच लक्ष वेधून घेत असतो.

अमिताभ बच्चन काय म्हणाले?

आता केबीसीच्या शूटिंगपूर्वी त्यांना अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये त्याबद्दल लिहिले आणि प्रेक्षकांचे आभार मानले. त्यांनी लिहिले, “उद्या केबीसीच्या शूटिंगचा पहिला दिवस आहे. तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वाद आणि प्रेमाने, आणखी एका आव्हानाला सामोरे जाण्यासाठी मी सज्ज झालो आहे.” तसेच त्यांच्या चाहत्यांनी फोन, मेसेजद्वारे शुभेच्छा दिल्या. त्यासाठी त्यांनी चाहत्यांचे आभार मानले. तसेच प्रत्येकाला वैयक्तिकरित्या शुभेच्छा देणे शक्य नसले तरी तुम्हा सगळ्यांसाठी ही पोस्ट लिहित असल्याचे म्हटले.

अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यात २ ऑगस्ट या दिवसाला विशेष महत्त्व आहे, कारण १९८२ साली याच दिवशी ‘कुली’ चित्रपटाच्या सेटवर ते एका जीवघेण्या अपघातातून थोडक्यात बचावले होते. ज्या चाहत्यांनी त्या घटनेची आठवण ठेवली आणि शुभेच्छा पाठवल्या त्या सर्वांप्रति त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

आणखी एका पोस्टमध्ये अमिताभ बच्चन यांनी लिहिले, “२ ऑगस्टचे महत्त्व फार कमी लोकांना समजते. पण ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. तुमच्या प्रार्थनांमुळेच आज या माध्यमातून तुम्हा सर्वांप्रति माझी कृतज्ञता व्यक्त करणे मला शक्य झाले. वेळ खूप शक्तिशाली आहे आणि आजचा हा क्षण तुमच्या प्रार्थनांमुळेच नेहमी शक्य झाला आहे”, असे म्हणत अमिताभ बच्चन यांनी भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, कौन बनेगा करोडपतीचा अठरावा सीझन १० ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.