Amitabh Bachchan Emotional post for Dharmendra : दिग्गज बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे सोमवारी, २४ नोव्हेंबर रोजी ८९ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ‘शोले’तील विरूच्या निधनानंतर जय म्हणजेच महानायक अमिताभ बच्चन यांनी भावुक पोस्ट केली आहे. अमिताभ बच्चन यांनी रात्री अडीच वाजता भावनांना वाट मोकळी करून दिली.

सोमवारी धर्मेंद्र यांच्या अंत्यदर्शनासाठी अमिताभ बच्चन विलेपार्ले येथील स्मशानभूमीत गेले होते.यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचा नातू अगस्त्य नंदादेखील होती. अमिताभ बच्चन यांनी जवळच्या मित्राला अखेरचा निरोप दिल्यानंतर एक्सवर पोस्ट केली आहे. बिग बींना धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातमीने लाखो चाहते आणि संपूर्ण चित्रपट उद्योगाला मोठा धक्का बसला आहे. कारण धर्मेंद्र यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला आहे. धर्मेंद्र यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबीय सोशल मीडियावर पोस्ट करून आठवणींना उजाळा देत आहेत. ५० वर्षांपूर्वी ‘शोले’ या प्रतिष्ठित चित्रपटात धर्मेंद्र यांच्याबरोबर काम करणारे अमिताभ बच्चन मित्राच्या निधनाने दुःखी आहेत.

अमिताभ बच्चन यांची पोस्ट

“आणखी एक दिग्गज आपल्याला सोडून गेला.. तो आता आपल्यातून कायमचा निघून गेला आहे..तो मागे एक असह्य अशी भयाण शांतता सोडून गेला आहे..

धरमजी…महानतेचे प्रतीक, ते केवळ त्यांच्या दिसण्यासाठी नाही तर त्यांच्या मोठ्या मनासाठी आणि साधेपणासाठी कायम ओळखले जायचे.

..ते पंजाबमधील गावातील मातीचा सुगंध आपल्याबरोबर घेऊन आले होते आणि ते जिथून आले होते, त्याच मूळ स्वभावाबरोबर कायम प्रामाणिक राहिले.. एक असं क्षेत्र जिथे प्रत्येक दशकात बदल होत राहिले, पण ते मात्र कधीच बदलले नाहीत. त्यांचं हसणं, त्यांचा रुबाब, त्यांचं प्रेम त्यांच्या सभोवताली असलेल्या प्रत्येकाला जाणवायचं. या गोष्टी या इंडस्ट्रीत फार कमी पाहायला मिळतात. त्यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली आहे, ती पोकळी कायम राहील,” अशी पोस्ट अमिताभ बच्चन यांनी केली आहे.

दरम्यान, धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट अमिताभ बच्चन यांच्या नातवाबरोबरचा आहे. धर्मेंद्र यांनी अगस्त्य नंदाबरोबर ‘इक्कीस’मध्ये काम केलं आहे. या चित्रपटातील धर्मेंद्र यांचं लूक पोस्टर रिलीज करण्यात आलं आणि काही तासांनी त्यांच्या निधनाची बातमी आली. ‘इक्कीस’ हा चित्रपट २५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.